१ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पातून विशेष काय मिळणार याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडून प्रत्येक क्षेत्राच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत. तसेच २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या अर्थसंकल्पाकडून तंत्रज्ञान क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत याबाबत माहिती जाणून घेऊया…
( हेही वाचा : मुंबईतील वाढत्या मातामृत्यूची संख्या रोखण्यात यश )
तंत्रज्ञान क्षेत्राच्या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा?
सध्या सर्वत्र मॉर्डन टेक्नोलॉजीचे युग आहे त्यामुळे तज्ज्ञांच्या मते डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासावर खर्च करणे ही काळाची गरज आहे. अलिकडे प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करू लागला आहे त्यामुळे सायबर सुरक्षा वाढवणे ही काळाची गरज आहे. देशाच्या सुरक्षेसाठीही गोपनीयता, संरक्षण यागोष्टी महत्त्वाच्या आहेत.
सध्या देशातील बहुतांश नागरिकांकडे स्मार्ट गॅझेट, उपकरणे आहेत. त्यामुळे सरकारने वाढीव आयात कराचा बोजा कमी करावी अशी गुंतवणूकदार आणि उत्पादकांची अपेक्षा आहे. कर सूट आणि तंत्रज्ञान विषयक नव्या योजनांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, मेटाव्हर्स, 5G यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावरील खर्चात वाढ करणे अपेक्षित असणार आहे. डिजिटल परिवर्तन, डिजिटल क्रांती यावर भविष्य अवलंबून असणार आहे त्यामुळे तंत्रज्ञानावर विशेष गुंतवणूक करण्याची अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.