वादग्रस्त बुल्ली बाई अ‍ॅप : दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

देशभरात गाजत असलेल्या वादग्रस्त बुल्ली बाई अ‍ॅप हे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी विकसित करण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या एकंदर तपासात समोर येत आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दोन समाजाला लक्ष करून या वादग्रस्त अ‍ॅपचा प्रचार सोशल मीडियावर सुरु केला होता, असे तपासात समोर आले आहे.

आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

मुंबईतील पश्चिम सायबर पोलिस ठाण्यात २ जानेवारी रोजी दाखल झालेल्या बुल्ली बाई अ‍ॅप प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. बंगळुरू येथून कुमार विशाल झा (२१), उत्तराखंड येथून श्वेता सिंह (१८) आणि मयंक रावत या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी दिली आहे. सायबर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली तरुणी ही या सर्व प्रकरणाची मास्टरमाइंड आहे, कुमार विशाल हा बुल्ली बाई अ‍ॅपचा फॉलोअर्स आहे. सहा महिन्यांपूर्वी सुल्ली डिल्स या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांचे फोटो प्रदर्शित करून गिट हब या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्याच्यावर बोली लावली जात होती.

(हेही वाचा बुल्ली अ‍ॅपवर कारवाई कराच, पण हिंदू महिलांची बदनामी करणा-या शेकडो अ‍ॅप, वेबसाईटचे काय?)

सहा विविध ट्विटर हँडलवरती छायाचित्रे प्रदर्शित

त्याच धर्तीवर बुल्ली बाई अ‍ॅप विकसित करून मुस्लिम महिलांना बदनामी करण्याच्या हेतूने सहा विविध ट्विटर हँडलवरती छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आले होते आणि हे सर्व ट्विटर हँडल शीख समाजाच्या संबंधित तयार करून  बुल्ली बाई हे अ‍ॅप खालसा शीख फोर्स (केएसएफ) यांनी विकसित केल्याचे भासवण्यात आले होते. हे अ‍ॅप विकसित करण्यासाठी गीटहब या प्लँटफर्म वापर केला गेला होता. हा सर्व प्रकार दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. तसेच या सर्व प्रकरणात परदेशातील कुठल्या व्यक्तीचा अथवा देशातील कुठल्या मोठ्या व्यक्तीचा सहभाग आहे का? याचा तपास सुरु आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here