राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता याच सुनावणी नंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय यावर निर्णय देणार आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळणार की नाही याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
निकाल अपेक्षित
बैलगाडा शर्यतीवर मुंबई उच्च न्यायालयाने 2017 मध्ये बंदी घातली होती. त्याला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान केलं होत. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने यावर राज्य सरकारची बाजू ऐकली. आता गुरुवारी पेटा ही प्राणी प्रेमी संस्था आपली बाजू मांडणार आहे. पेटा संस्थेने आपली बाजू मांडल्यानंतर न्यायालय निकाल घोषित करणे अपेक्षित आहे.
प्राणीमित्र मागणीवर ठाम
बैलगाडा शर्यतीवरील ही बंदी उठवण्यासाठी विधानसभेपासून लोकसभेपर्यंत मागणी झाली. घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकानं, मोठ्या काठीनं अमानुष मारणं, बॅटरीचा शॉक देणं, टोकदार खिळे लावणं, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असं सांगत प्राणीमित्रांनी शर्यतींवर बंदी घालण्याची मागणी केली होती. अजूनही प्राणीमित्र आपल्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारची याचिका निकाली काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
( हेही वाचा: बर्फ वितळतोय, लाखो-हजारो वर्षांपूर्वीचे विषाणू होतायत जागे! तज्ज्ञांनी काय दिला इशारा? )
Join Our WhatsApp Community