एकीकडे रिक्षा चालक भाडे नाकारून प्रवाशांसोबत वाद घालतात, तर दुसरीकडे रिक्षा चालकाची तक्रार घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पोलीसांची दादागिरी सहन करावी लागत असल्याचा प्रकार कुर्ला पश्चिम येथे घडला. बीकेसी येथे जाणाऱ्या एका वरिष्ठ पत्रकाराला या अनुभवातून जावे लागले, परंतू या पत्रकाराने ही सर्व घटना आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात कैद केल्यामुळे रिक्षा चालकांची मुजोरी आणि वाहतूक पोलिसांची दादागिरी समोर आल्यामुळे अखेर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना याची दखल घ्यावी लागली.
कुर्ला पोलीस ठाण्यात या वाहतूक पोलीसावर अदखलपात्र गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी लावण्यात आली आहे. वरुण सिंह हे एका इंग्रजी दैनिकाचे वरिष्ठ पत्रकार आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते बीकेसी येथे जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या बाहेर आले व त्यांनी रिक्षा चालकांना बीकेसी येणार का म्हणून विचारले, रिक्षा चालकांनी मीटरवर बीकेसीला येण्यास नकार देत, शेअरिंग येणार असाल तर बसा असे सांगितले. परंतु वरुण सिंह यांना कार्यालयात तातडीने पोहचणे गरजेचे असल्यामुळे त्यांनी तुम्ही मीटरने चला, असे रिक्षाचालकांना सांगूनही कोणीही मीटरवर येण्यास तयार झाले नाही.
वरुण सिंह हे रिक्षा चालकांना विचारत नशेमन हॉटेलपर्यंत आले. तिकडेही रिक्षा चालकांनी मीटरवर येण्यास नकार दिला.
सिंह यांनी कर्त्यव्यावर असलेले वाहतूक पोलिसांचा परिसरात शोध घेतला असता वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप हे एका रिक्षात बसून गप्पा मारत होते. सिंह यांनी त्यांच्याकडे रिक्षा चालकांची तक्रार करण्यासाठी गेले असता जगताप यांना रिक्षा चालकांची तक्रार करतो म्हणून राग आला व पत्रकार वरूण सिंह यांच्यासोबत अरेरावीची भाषा करून सिंह याना बळजबरीने रिक्षात बसवून चल तुला दाखवतो आता असे म्हणून रिक्षा चालकाला रिक्षा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले.
वरूण सिंह यांना जगताप यांनी दादागिरी करून रिक्षातच मारहाण सुरू केली, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी देऊ लागले, हा सर्व प्रकार वरून सिंह यांनी आपल्या मोबाईलमधील कॅमेरात कैद केला व जगतापसोबत कुर्ला पोलीस ठाणे गाठून मोबाईल ध्ये कैद केलेला प्रकार वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दाखवून तक्रार दाखल केली. कॅमेरातील फुटेज वरून कुर्ला पोलिसांनी वाहतूक पोलीस जगताप यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरूण सिंह यांनी दिली.
दरम्यान झालेला सर्व प्रकाराचा व्हिडीओ वरुण सिंह यांनी ट्विटर वर ट्विट केला असता वाहतूक सहपोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त यांनी दखल घेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
पत्रकार वरूण सिंह …
वाहतूक पोलीस जगताप हे निवृत्तीच्या वाटेवर असून तुम्ही हे प्रकरण मागे घेऊन त्यांना माफ करावे असे एका अधिकाऱ्याने मला सांगितले, परंतु मी त्यांना साफ सांगितले की, हे प्रकरण केवळ माझ्यापुरते राहिलेले नाही, इतर सामान्यांचे प्रकरण झाले आहे, मी जरी त्यांना माफ केले इतर सामान्यांना मी निराश केल्यासारखे वाटेल असे त्या अधिकाऱ्याला सांगितले असता ते काहीही न बोलता निघून गेले असे वरूण सिंह यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले.
पोलीस मदत करीत नाहीत
मी बीकेसी येथे एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. मी रहायला वाशी येथे आहे. मला दररोज कुर्ला येथून बीकेसीला जावे लागते. रिक्षावाले मीटरने घेऊनच जात नाहीत. एका रिक्षात चार प्रवाशांना बसवतात व प्रत्येक प्रवशाकडून ३०ते ४० रुपये भाडे घेतात, असे रिक्षा प्रवासी सागर रायते यांनी सांगितले. तसेच, हा सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असतो. परंतु ते रिक्षा चालकांवर कुठलीही कारवाई करत नाहीत, उलट रिक्षा चालकांना प्रवासी भरण्यास मदत करतात असेही रायते यांनी म्हटले.
( हेही वाचा: प्राध्यापक साईबाबा यांच्या सुटकेच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती )
तुम्ही वाहतूक पोलिसांकडे तक्रार करा
कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानकजवळ असलेल्या कै.राजू जाधव पोलीस बीट (चौकी) आहे, या चौकीच्या समोरच शेकडो रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा उभी करून प्रवासी भाडे घेत असतात. त्यांना जवळचे भाडे नको असते. विमानतळ, अंधेरी, बोरिवली कांदिवली या ठिकाणचे भाडे त्यांना पाहिजे असतात. बेशिस्तपणे रिक्षा उभी करून पादचाऱ्यांची वाट अडवणाऱ्या या रिक्षा चालकाविरोधात चौकीत तक्रार करण्यासाठी गेल्यावर तुम्ही वाहतूक पोलिसांकडे तक्रार करा, असे उत्तर राजू जाधव बीट चौकीमधील पोलीस देतात असे ठाण्यात राहणारे दिनकर पाटील यांनी सांगितले.
रिक्षा चालक आणि फेरीवाल्याकडून २० ते ५० रुपयांची दररोज वसुली
कुर्ला स्टेशन परिसर हा रिक्षा चालक तर दुसरीकडे फेरीवाल्यांनी व्यापला गेला आहे. बेशिस्त फेरीवाले व रिक्षा चालकांमुळे पादचाऱ्यांना येथून चालणे मुष्किल होत आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यास गेल्यावर तेदेखील याकडे दुर्लक्ष करतात. राजू जाधव बीट चौकीतील पोलीस येथील प्रत्येक रिक्षा चालक आणि फेरीवाल्यांकडून २० ते ५० रुपये दररोज हप्ता घेत असल्यामुळे पोलीसांकडून कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक पोलीसदेखील सामील असल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
Join Our WhatsApp Community