महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून बोगस देयकांसंदर्भात धडक मोहीम राबविली जात आहे. त्याअंतर्गत पुण्यातील मे. शिव स्टील ट्रेडर्सच्या दौलत शिवलाल चौधरी याला ७२.६८ कोटींची बनावट खरेदी व विक्री देयके सादर केल्याप्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
वस्तू व सेवाकर विभागाकडील उपलब्ध विश्लेषण प्रणालींच्या आधारे सखोल तपास करून करचोरांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मे. शिव स्टील ट्रेडर्सविरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधात विशेष अन्वेषण कारवाई सुरू करण्यात आली होती. दौलत शिवलाल चौधरी या व्यापाऱ्याने बनावट खरेदी व विक्री देयकांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊन शासनाची १३.०८ कोटींची कर महसूल हानी केल्याचे त्यात उघड झाले. संबंधित आरोपीला अटक करून पुण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे हजर केले असता, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
( हेही वाचा : खासदार फुटीच्या चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार)
राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त (अन्वेषण) सुधीर चेके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त (अन्वेषण) हृषीकेश अहिवळे, चंदर कावळे, प्रदीप कुलकर्णी, श्रीकांत खाडे व अन्वेषण विभागातील राज्यकर निरीक्षक यांनी ही धडक कारवाई केली. या मोहिमेंतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.