गावी भांडण करून आलेल्या एका तरुणाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून झवेरी बाजार येथे बॉम्ब ठेवण्यात आला असल्याची माहिती देऊन संपूर्ण पोलीस यंत्रणेची झोप उडवून दिली होती, या कॉलमुळे पोलिसांची एकाच तारांबळ उडाली, संपूर्ण परिसर पिंजून काढल्यानंतर कुठलीही संशयास्पद वस्तू सापडली नाही आणि हा कॉल केवळ अफवेचा असल्याचे समजताच पोलिसांचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या तरुणाला भुलेश्वर येथील पंचायत वाडी येथून अटक करण्यात आली आहे. संबंधित तरूणाचे नाव दिनेश पांडुरंग सुतार,(२४) असे असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील मिरज येथे राहणारा आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर एका मोबाईल क्रमांकावरून निनावी कॉल आला होता, कॉल करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील झवेरी बाजार येथील खाऊ गल्ली या परिसरात बॉम्ब ठेवलेला असून मोठा घातपात घडणार आहे असे सांगितले होते. झवेरी बाजार हा परिसर व्यवसायिक क्षेत्र असून तसेच या पूर्वी देखील या परिसरात अशाप्रकारच्या घटना घडल्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, बॉम्बचा शोध घेण्यासाठी श्वान पथक , बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते, तसेच एटीएसचे पथक सुद्धा याठिकाणी दाखल झाले होते. काही वेळासाठी हा परिसरात रिकामा करण्यात आला होता.
गावी भांडण करून आलेल्या तरुणाचे कृत्य
सुरक्षा यंत्रणेने हा संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र कुठेही संशयास्पद वस्तू तसेच बॉम्बसदृश्य वस्तू आढळून न आल्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे समोर आले. कोणीतरी अफवा पसरविण्यासाठी तसेच पोलीस यंत्रणेला त्रास देण्यासाठी हा कॉल केल्याचे लक्षात आले. दरम्यान याप्रकरणी लो.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व कॉल कर्त्याचा शोध घेण्यासाठी ज्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचा कॉल आला त्या क्रमांकाचा पोलिसांनी शोध घेऊन भुलेश्वर येथील पंचायतवाडी येथून दिनेश पांडुरंग सुतार या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, तो मागील दहा दिवसापूर्वी घरातून भांडण करून मुंबईत आला होता आणि भुलेश्वर येथे फुटपाथवर राहत होता अशी माहिती समोर आली, तसेच जामखेड, जिल्हा अहमदनगर येथील फेसबुक मैत्री झालेली एक महिला त्याला सतत त्रास देत असल्यामुळे त्याने जामखेड येथे कॉल करून सुद्धा बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देऊन पोलीस यंत्रणेला कामाला लावले होते अशी माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community