10 रुपयापासून ते 2 हजार रुपयांपर्यंतच्या नोटेवर भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या, RBIच्या गव्हर्नरची सही असते. ही सही असलेल्या नोटाच संपूर्ण भारतात ख-या नोटा म्हणून चालतात.
पण भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ऑगस्ट 1947 ते जून 1948 या काळात जेव्हा आरबीआय भारताबरोबरच पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम करत होती, तेव्हा महाराष्ट्रात जन्माला आलेले कोकण रत्न सी.डी. देशमुख हे आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यांनी सह्या केलेल्या नोटा या त्यावेळी भारतासह तीन देशांतील चलनात वापरल्या जात होत्या.
(हेही वाचाः फाळणीनंतरही RBI पाकिस्तानसाठी काम करत होती, काय होतं कारण?)
पहिले भारतीय गव्हर्नर
1947 साली देशाची फाळणी झाली, तेव्हा आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून सी.डी. देशमुख काम पाहत होते. 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949 अशी सहा वर्ष देशमुख आरबीआयचे गव्हर्नर होते. त्यामुळे नियमाप्रमाणे सी.डी. देशमुख यांची सही असलेल्या नोटा पाकिस्तानात वापरल्या जात होत्या.
(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)
ब्रह्मदेशची नोट
इंग्रजांनी 1937 साली म्यानमार(ब्रह्मदेश) भारतापासून तोडून वेगळा केला. पण 1947 साली म्यानमारची मध्यवर्ती बँक स्थापन होईपर्यंत आरबीआयने म्यानमारसाठी देखील काम केले. तेव्हा देशमुखांची सही असलेली ही नोट म्यानमारमध्ये देखील चलन म्हणून वापरली जात होती.
(हेही वाचाः सोसायटींमधील वादांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तांची घोषणा)
कोण आहेत देशमुख?
चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांचा जन्म कोकणातील रायगड म्हणजेच तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यात 14 जानेवारी 1896 रोजी झाला. इंग्रजांच्या काळात सर्वात कठीण असलेली भारतीय नागरी सेवा परीक्षा देशमुख उत्तीर्ण झाले होते. स्वातंत्र्यानंतर 1950 ते 1956 च्या काळात त्यांनी भारताचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. भारतातील एलआयसीच्या स्थापनेतही त्यांचा फार मोठा आहे. एक अत्यंत हुशार अर्थतज्ज्ञ म्हणून देखील त्यांना ओळखले जाते.