Rupee Bank: परवाना रद्द! पुण्यातील साडेचार हजार ज्येष्ठांचे बुडाले ३५० कोटी

136

रूपी बँकेचा व्यवसायाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे ४ हजार ५०० ज्येष्ठ नागरिकांचे तब्बल ३५० कोटी रूपये बुडीत खाती जमा होणार आहेत. यातील बहुतेकांचा निवृत्तीकाल या बँकेत ठेवलेल्या या ठेवींच्या व्याजावरच सुरू होता. आता व्याजही गेले व पैसेही गेले अशी वेळ त्यांच्यावर आली आहे.

(हेही वाचा – वॉर्डमध्ये फिरा, लोकांची कामं करा; माजी नगरसेवकांना उद्धव ठाकरेंचा कानमंत्र)

मागील काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या रूपी सहकारी बँकेचा व्यवसाय करण्याचा परवाना अखेर आरबीआयने २२ सप्टेंबर २०२२ नंतर रद्द केला आहे. त्यामुळे बँकेला आता दिवाळखोरी जाहीर करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. सहकार आयुक्तांकडून आता त्यासाठी एका अधिकाऱ्याची किंवा एखाद्या समितीची नियुक्ती केली जाईल. ही समिती बँकेचे आर्थिक मूल्यमापन करेल. त्यानंतर त्या रकमेतून ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, त्याआधी ठेव सुरक्षा विमा महामंडळाचे पैसे ते काढून घेतील.

ठेव सुरक्षा महामंडळाने ६४ हजार ठेवीदारांना कमाल ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. म्हणजे १ कोटी रुपये ठेव असली तरीही त्या ठेवीदाराला ५ लाख रुपयेच मिळाले आहेत. ५ लाखांपेक्षा कमी ठेव असेल तर त्याची जेवढी रक्कम आहे ती परत करण्यात आली आहे. परत करण्यात आलेली ही रक्कम ७०० कोटी रुपयांची आहे असे बँकेच्या प्रशासक मंडळाकडूनच अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.