केअरटेकर महिलेने ७७ वर्षाच्या पित्यासोबत बेकायदेशीर विवाह करून पित्याच्या मृत्यूनंतर मृतदेह अंत्यविधीसाठी
स्मशानभूमीत आणणाऱ्या ४४ वर्षीय केअरटेकर महिलेची पोलखोल मृत वृद्ध इसमाच्या मुलीने केली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात केअरटेकर महिला आणि तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला प्रकार
येझदीयार एडलबेहराम (७७) हे घटालिया मेन्शन, डॉ. आंबेडकर रोड, दादर टीटी येथे राहण्यास होते. त्यांना नताशा (४४) ही एकुलती एक मुलगी असून तिचा विवाह झालेला आहे. ती पतीसह पारसी कॉलनी, अंधेरी पूर्व या ठिकाणी राहण्यास आहे. येझदीयार यांच्या पत्नीचा ४ वर्षांपूर्वी निधन झाले असून येझदीयार यांची काळजी व सुश्रुषा करण्यासाठी मुलगी नताशा हिने मंगल कल्याण गायकवाड (४४) हिला कामावर ठेवले होते. मंगल ही १० वर्षाचा मुलगा यश याच्यासोबत येझदीयार यांच्याच घरात राहून त्यांची काळजी घेत होती. नताशा अधून मधून वडिलांना फोन करून तब्येतीची विचारपूस करीत असे, मागील महिन्यात नताशा वडीलाच्या फोनवर फोन लावत होती मात्र वडील फोन घेत नसल्याचे बघून तीने आत्याच्या मुलाला फोन करून काय झाले विचारले असता वडिलांची तब्येत ठीक नसुन डॉक्टर घरी येऊन गेले होते असे सांगितले. नताशाने फॅमिली डॉक्टरला फोन करून विचारले असता वडिलांचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले.
केअरटेकर म्हणून कामावर ठेवलेल्या महिलेने याबाबत आपल्याला काही कसे कळवले नाही म्हणून नताशा तडक दादर येथे आली. वडिलांना डुंगरवाडी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी घेऊन जाण्यात आले असल्याचे कळताच नताशा आणि नातेवाईक थेट स्मशानभूमीत गेले. नताशाने केअरटेकर मंगल हिच्याकडे चौकशी केली असता तिने काही न सांगता स्मशानभूमीतून काढता पाय घेतला. नताशाने वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच मृतदेहावर अंत्यविधीसाठी परवानगीचे पोलीसांचे ना हरकत पत्र बघून नताशाने कुठलाही संशय न घेता मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
संपत्ती, दागिने, घर हडपण्याकरिता रचला कट
अंत्यसंस्कार आटोपल्यावर स्मशानभूमीत जमा केलेले कागदपत्रे तपासली असता तिला धक्काच बसला. मंगल आणि वडिलांचे लग्नाचे प्रमाणपत्र आणि त्याच्यावर वडिलांची सही बघून वडिलांनी लग्न केल्याचे का सांगितले नाही. त्यानंतर नताशाच्या लक्षात आले की, मंगल ही वडिलांशी मला बोलू देत नव्हती, भेटू देत नव्हती घरी गेल्यावर तिने इकडे पुन्हा यायचे नाही असे सांगितले होते, वडील तिच्या दबावाखाली होते. वडिलांनी नताशाला सांगण्याचा प्रयत्न केला मात्र मंगलला घाबरून ते काही बोलत नव्हते. मंगल हिने हा सर्व प्रकार वडिलांची संपत्ती, दागिने, घर हडपण्याकरिता केला असल्याची खात्री पटली असता नताशाने माटुंगा पोलीस ठाणे गाठून मंगल आणि तिचा मुलगा कृष्ना गायकवाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. वडिलांची संपत्ती हडपण्यासाठी, मंगल आणि तिच्या पहिल्या पतीचा मुलगा कृष्णा याने कट रचून वडिलांसोबत बळजबरीने लग्न करून त्यांची हत्या केली असावी आणि कुणाला काही न कळवता वडिलांच्या मृत्यूचे खोटे कागदपत्रे तयार केल्याचा संशय नताशा हिने पोलिसांकडे व्यक्त केला आहे.माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा- )
मंगल हिची पार्श्वभूमी तपासली असता मंगलचे पहिले लग्न कल्याण गायकवाड या इसमासोबत झाले असून त्यांचा घटस्फोट झालेला आहे. पहिला पती कल्याणपासून मंगलला कृष्णा हा मुलगा झालेला आहे. मंगलचे दुसरे लग्न टक्सीचालक नामे राजेश शर्मा याच्यासोबत झाले असून त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. दुसरा पती राजेश याच्यापासून मंगलला यश हा मुलगा झालेला आहे. मंगलचा घटस्फोट झाला नसताना सुध्दा तिने येझदीयार एडलबेहराम त्यांच्यावर दबाव टाकून रजिस्टर लग्न केले असावे, असा संशय येझदीयार यांची मुलगी नताशा हिने व्यक्त केला आहे.