राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ड्रग्स युनिटचे अधिकारी चोरून ड्रग्स विकत होते, तर एका अधिकाऱ्याने पतीच्या बदलीसाठी ३३ लाख रुपये घेतले आणि काम केले नाही. त्यामुळे पतीच्या आत्महत्येला हे दोन अधिकारी जबाबदार असल्याची तक्रार रमेश मोहिते या अधिकाऱ्याच्या पत्नीने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात केली आहे. रमेश मोहिते दुय्यम निरीक्षक अधिकारी असून मालाड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे खाली त्यांनी आत्महत्या केली. या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी दोन अधिकाऱ्यांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
असे आहे प्रकरण
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुलाबा येथील ड्रग्स युनिटमध्ये दुय्यम निरीक्षक या पदावर काम करणारे अधिकारी रमेश मोहिते यांनी २० डिसेंबर रोजी मालाड रेल्वे स्थानकात ट्रेनखाली आत्महत्या केली होती. बोरिवली पोलिसांना त्याच्या बॅगेत सुसाईड नोट मिळून आली होती. या सुसाईड नोट मध्ये रमेश मोहिते यांनी कार्यालयातील लिपिक कृष्णा केतन आणि वांद्रे उपनगरचे निरीक्षक रियाज खान यांची नावे लिहलेली आहेत.
(हेही वाचा – मुंबईत ‘मिनी लॉकडाऊन’ लागणार?, महापौर पेडणेकरांकडून इशारा)
राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्त कार्यालयातील लिपिक कृष्णा केतन हे मला कामात मानसिक त्रास देत आहे. त्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, तर माझ्या आत्महत्येला कृष्णा केतन हे जवाबदार आहे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असे लिहण्यात आले होते. तसेच दुसऱ्या चिठ्ठीत वांद्रे उपनगर निरीक्षक रियाज खान यांनी माझ्याकडून बदली करण्यासाठी ३३ लाख रुपये घेतले आहे, मात्र त्यांनी माझी बदली केलेली नाही, मी कर्ज काढून त्यांना पैसे दिले आहे, माझ्या मृत्यूनंतर त्यांनी ते रक्कम माझ्या पत्नीला द्यावी, असे म्हटले आहे.
तक्रारीवरून गुन्हा दाखल
या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी रमेश मोहिते यांची पत्नी सुरेखा मोहिते यांच्या तक्रारीवरून आणि कृष्णा केतनसह रियाज खान यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्यची माहिती बोरिवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल मोहिते यांनी दिली आहे. तर दुय्यम निरीक्षक रमेश मोहिते यांनी केलेल्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आम्हाला कळवले असून, गुन्हा दाखल झाल्याचे अद्याप कळविण्यात आलेले नसल्यामुळे रेल्वे पोलिसांकडून अधिकृतपणे कळविण्यात आल्यानंतर संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community