कोळसा घोटाळ्याप्रकरणी CBI ची मोठी कारवाई, पश्चिम बंगालच्या ‘या’ मंत्र्याच्या घरावर धाड

168

पश्चिम बंगालमधील आसनसोल येथील प्रसिद्ध कोळसा तस्करी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी मोठी कारवाई केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री मलय घटक यांच्या सात ठिकाणांवर सीबीआयने सकाळी 8.15 च्या सुमारास छापे टाकले. यातील तीन ठिकाणे राजधानी कोलकाता आणि उर्वरित चार आसनसोल येथील त्याच्या वडिलोपार्जित निवासस्थानाशी संबंधित आहेत.

(हेही वाचा – ऑर्थर रोड तुरूंगात राऊतांना भेटण्यास उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारली, पण…)

सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजभवनाजवळील आमदार निवासाशिवाय कोलकाता येथील लेक गार्डनमधील मलय घटक यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले आहेत. मलय घटक आमदार निवासात उपस्थित आहेत. कोळसा तस्करी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून मंत्र्यांचीही चौकशी केली जात आहे. या काळात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. घरी येणाऱ्यांच्या नोंदी तपासल्या जात आहेत.

विशेष म्हणजे सीबीआय अधिकाऱ्यांसह केंद्रीय निमलष्करी दले सुरक्षेसाठी हजर आहेत. याशिवाय कोळसा तस्करी प्रकरणी डायमंड हार्बर रोड येथे राहणारे व्यापारी प्रतिक दिवाण यांच्या अलीपूर येथील घरावरही छापा टाकण्यात आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिवाण हे मलय घटक आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या जवळचे आहेत. प्रतिक घरी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे अभिषेक बॅनर्जी यांची ईडीने गेल्या आठवड्यात चौकशी केली होती.

आसनसोलच्या आजूबाजूच्या कोळसा क्षेत्रामध्ये बंद पडलेल्या ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (ECL) खाणींमधून मोठ्या प्रमाणात कोळशाची चोरी आणि तस्करी झाली आहे. अनेक वर्षांपासून अवैधरित्या उत्खनन केलेला कोळसा काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी केली असल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.