परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाची कसून चौकशी करत असून, आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. रविवारी त्यांचा जबाब नोंदवण्यात येण्याची माहिती मिळत आहे.
सीबीआय चौकशीत समोर आले नाव
मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करुन १५ दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश ५ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यामुळे आत सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे. ८ एप्रिल रोजी सीबीआयने परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यासह चार जणांचे जबाब नोंदवले आहेत. संजीव पालांडे यांनीच संजय पाटील आणि राजू पाटील या दोन पोलिस अधिका-यांना वसुलीबाबत सांगितले असल्याचे या जबाबात म्हटले होते. त्यामुळे आता पालांडे आणि शिंदे यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचाः १०० कोटींच्या पत्रावर दोन कोटीच्या पत्राचा उतारा!)
देशमुख यांनी केले होते चौकशी टाळण्याचे प्रयत्न
मुंबई उच्च न्यायालयाने सिंग यांच्या पत्राची सीबीआय चौकशी करण्याचा निर्णय दिल्यानंतर, अनिल देशमुख यांना नैतिकतेच्या मुद्द्यावरुन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हा राजीनामा देताक्षणीच त्यांनी थेट दिल्लीकडे कूच केले होते. सीबीआय चौकशी टाळण्यासाठी त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ मनु सिंघवी यांची दिल्लीत भेट घेतली. सिंघवी यांच्याशी चर्चा केल्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात सीबीआय चौकशीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. आपली बाजू ऐकून न घेता ही चौकशी होत असल्याने ती तात्काळ रोखावी, अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
Join Our WhatsApp Community