शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून ‘सेलिब्रिटी स्कुल’ सुरू करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ (सेलिब्रिटी) इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व आदी कला शिकवतील. त्यानंतर स्पर्धा घेवून पहिल्या १ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेले सेलिब्रिटी या १ हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देतील, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यांनी केली.
( हेही वाचा: होळीसाठी रासायनिक नको तर नैसर्गिक रंग वापरा ! )
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा भव्य व देखणा असा सांस्कृतिक सोहळा रविवार ५ मार्च २०२३ तोजी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्या मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तबगारी दाखवून नेतृत्व करण्याची संधी मिळेल, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निश्चित आहे. या विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सरकारने आधुनिक शैक्षणिक धोरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर भर दिला आहे. सर्व प्रकारचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचाही प्रारंभ आता होत आहे. त्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी आता सेलिब्रिटी स्कूल सुरु करण्याचे नियोजित आहे, असे उद्गार मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन शैक्षणिक धोरण आता राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून उच्च व तंत्र शिक्षणासह इतरही सर्व प्रकारचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांचा ओघ वाढणार आहे. मराठी मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. कोणतेही काम लहान नसते, हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी श्रमाचा सन्मान करणे, त्यांच्यामध्ये रुजवले पाहिजे. भारत हा आता तरुणांचा देश असणार आहे. जगाला आवश्यक ते मनुष्यबळ पुरवण्याचे उत्तरदायित्व भारतावर आहे, असेही त्यांनी सांगितले.
या सोहळ्यास राज्याचे पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार राजहंस सिंह, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (शिक्षण) (अतिरिक्त कार्यभार) अजित कुंभार, सहआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, सहायक आयुक्त (एम पश्चिम) विश्वास मोटे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी राजेश तडवी, माजी उप आयुक्त (शिक्षण) केशव उबाळे, प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक यांच्यासह इतर मान्यवर, महानगरपालिकेचे विविध अधिकारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
इंद्रधनुष्य २०२३’ सोहळ्यामध्ये महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधील मिळून सुमारे २,१०० विद्यार्थ्यांनी १५ प्रकाराचे आविष्कार सादर केले. संचलन मानवंदनेने प्रारंभ झाल्यानंतर वाद्यवृंद वादन, विशेष विद्यार्थ्यांचे नाटक सादरीकरण, तालबद्ध (रिदमिक) योगासने, स्वरलता आदरांजली गीते, फ्रोलिक्स, एरोबिक्स रिंग, नृत्य नाटिका (बॅले), त्रिपुरा राज्यातील होजागिरी लोकनृत्य, मानवी मनोरे, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारे लेझीम नृत्य, तालबद्ध (रिदमिक) बास्केटबॉल, जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी मिळून चितारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, आझादी ७५ हे सूर व नृत्य यांचा संगम असणारे सादरीकरण, मिले सूर मेरा तुम्हारा आणि अखेरीस इंद्रधनुष्य शीर्षक गीत असे एकापाठोपाठ कला, क्रीडा प्रकार सादर करीत महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपण कोणत्याही स्पर्धेत मागे नाही, हे सिद्ध तर केलेच आणि उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले.
Join Our WhatsApp Community