पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर घरगुती गॅस, भाज्या आणि इतर वस्तू देखील महागल्या आहेत. अशातच सामान्यांना आणखी एक धक्का बसणार आहे. तुमचेही स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न असेल आणि त्यासाठी तुम्ही बजेटही ठरवले असेल तर थोडं थांबा. तुम्ही ठरवलेले बजेट वाढू शकते, कारण सिमेंटचे भाव देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहेत. सिमेंटच्या दरात प्रति बॅग 25 ते 50 रुपयांनी वाढ होणार असल्याचे वृत्त आहे.
12 महिन्यांत सिमेंटची किंमत वाढली
क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे की, उत्पादकांनी रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढलेल्या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 12 महिन्यांत सिमेंटची किंमत 390 रुपये प्रति बॅगपर्यंत वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. म्हणजेच सिमेंटचा भाव प्रति बॅग 435 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. सिमेंटच्या दरात वाढ झाल्याने घर बांधण्याच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहेत. उत्पादकांनी आता खर्च वाढवण्याचा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केल्याने सिमेंट प्रति बॅग 25-50 रुपयांनी महाग होऊ शकते. त्यामुळे स्वप्नातलं घर बांधणं आता महागणार असल्याचे दिसतेय.
(हेही वाचा – BEST ठप्प! वडाळा, कुर्ला, वांद्रे डेपोमधले बसचालक संपावर)
रस्तेमार्गे मालवाहतुकीचे शुल्कही वाढले
रेटिंग एजन्सी क्रिसिलने दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमती मार्चमध्ये सरासरी 115 डॉलर प्रति बॅरल होत्या. याशिवाय विविध कारणांमुळे आंतरराष्ट्रीय कोळशाच्या किमतीही वाढल्या आहेत. वीज आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने रस्तेमार्गे मालवाहतुकीचे शुल्कही वाढले आहे. क्रिसिल रिसर्चचे संचालक एच गांधी यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत सिमेंटची मागणी वार्षिक 20 टक्क्यांनी वाढली, परंतु अवकाळी पाऊस, मजुरांची अनुपलब्धता यासारख्या कारणांमुळे दुसऱ्या सहामाहीत ती कमी झाल्याचे समोर आले आहे.