बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पर्यटन वृद्धीसाठी आयआयटीएम तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे अधिकारी आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून उद्यानातील तंबूत रहाणाऱ्या या अधिकाऱ्यांना उदरांनी हैराण केले होते. तसेच या तीन दिवसांत एकाही वनाधिकाऱ्याने भेटून त्यांच्या सोयीसुविधांची विचारपूस न केल्याने या अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री तंबूतील वास्तव्य सोडत बाहेरच्या हॉटेलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने स्थानिक आदिवासी तरुणांच्या रोजगारासाठी घेण्यात आलेल्या या पाच दिवसांच्या कार्यशाळेला गालबोट लागले आहे.
सोमवारपासून राष्ट्रीय उद्यानात मध्य प्रदेशातून आयआयटीएमचे अधिकारी पाच दिवसांसाठी आले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे अधिकारीही होते. परंतु अधिकाऱ्यांना रहाण्यासाठी बंगला देण्याऐवजी तंबूत त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली. तसेच या अधिकाऱ्यांना कोणतेही वनाधिकारी भेटण्यास आले नाहीत. तसेच, त्यांच्या जेवण्याच्या व्यवस्थेचेही नियोजन उद्यान प्रशासनाने केले नाही. तंबूत ठेवलेले सामान तसेच वायर्स उंदरांनी कुरतडून टाकल्या. बुधवारी सायंकाळीही असाच प्रकार पुन्हा घडल्याने उंदरांच्या उपद्रवाला कंटाळलेल्या या अधिकाऱ्यांनी अखेर तत्काळ राष्ट्रीय उद्यानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
( हेही वाचा: World Immunization Day: जन्मल्यापासून लहान मुलांना आजरांपासून संरक्षण मिळण्यासाठी द्या ‘या’ महत्त्वाच्या लस )
गुरुवारी उद्यानातील निसर्ग प्रशिक्षण केंद्रात स्थानिक तरुणांसाठी आयोजित कार्यशाळेत अधिकारी हजर राहिले. परंतु सकाळीही उद्यान प्रशासनाकडून कोणीच त्यांची विचारपूस करायला आले नाही. त्यामुळे अधिकारी प्रचंड संतापले आहेत. याबाबतीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे संबंधित अधिकारी उद्यान प्रशासनाविरोधात तक्रार करणार आहेत. या संपूर्ण प्रकरणात प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.
Join Our WhatsApp Community