केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ वारंवार आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन करत असते. परंतु अनेकजण याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असतात. पण यामागे आर्थिक व्यवहार सुरळित होणे तसेच कर चुकवेगिरी रोखणे अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने 31 मार्च 2023 च्या आधी आपले आधार-पॅन लिंक करा, असे आवाहन केले आहे.
तुम्ही जर आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड हे निष्क्रीय होईल. याचा अर्थ कोणत्याही आर्थिक व्यवहारात तुम्हाला त्याचा वापर करता येणार आहेत. सेक्युरिटीज अॅंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानेही यासंदर्भात माहिती दिली आहे. मुदतीपूर्वी जर तुम्ही आधार पॅनशी लिंक केले नाही तर तुम्ही NSE आणि BSE सारख्या आर्थिक बाजारपेठांमध्ये कोणतेही व्यवहार करु शकणार नाहीत.
( हेही वाचा: दिवा ते रत्नागिरी पॅसेंजर ‘या’ तारखेपासून होणार अधिक वेगवान )
कधीपर्यंत लिंक करु शकता आधार-पॅन
आधार आणि पॅन मोफत लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 ही शेवटची तारीख होती. आता ही मुदत 31 मार्च 2023 पर्यंत आहे. पण करदात्यांना यासाठी 1 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
मुदतीपूर्वी आधार- पॅन लिंक केले नाहीत तर…
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आधार आणि पॅन लिंक करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. जर तसे केले नाही तर पॅन निष्क्रीय होईल. जर पॅन निष्क्रीय झाले तर संबंधित व्यक्ती आयकर परतावा भरु शकत नाही. तसेच रिफंड जारी करण्यात असक्षम असतील. याशिवाय डिफेक्टिव्ह रिटर्नसारखी प्रलंबित कामे पूर्ण होणार नाहीत.
कसे कराल आधार- पॅन लिंक
- प्राप्तिकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in. या पोर्टलवर जा
- Link Aadhaar या पर्यायावर क्लिक करा
- तुमचे पॅन, आधार क्रमांक आणि आधार कार्डवर नमूद आहे त्याप्रमाणे नाव तेथील रकान्यांमध्ये भरा
- भरलेली महिती तपासा आणि Submit बटणावर क्लिक करा
तुम्ही माहिती भरुन सबमिट केल्यानंतर डिस्प्लेवर लिंक यशस्वी झाल्याचा संदेश येईल. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.