केंद्र सरकारने सुरू केलेला मोफत बूस्टर डोस अभियान या महिन्या अखेरीस बंद होणार आहे. केवळ १५ दिवस बाकी असल्याने दोन्ही डोस घेऊन सहा महिने झालेल्यांनी तत्काळ अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.
(हेही वाचा – राज्यात मुसळधार पावसाची बँटिंग, शुक्रवारीही दिवसभर संततधार? जाणून घ्या वेधशाळेचा अंदाज)
दरम्यान, आतापर्यंत नागपूरात साडेतीन लाखांवर नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका क्षेत्रात १८ वर्षांवरील बूस्टर डोससाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक आहेत. केंद्र सरकारने ७५ दिवस निःशुल्क बूस्टर डोस अभियान राबविण्याचा निर्णय घेतला होता. ३० सप्टेंबर रोजी ७५ दिवस पूर्ण होत आहे. त्यामुळे हे सुरू असलेले निःशुल्क अभियान बंद होणार आहे. मनपा आणि शासकीय रूग्णालयाच्या केंद्रावर निःशुल्क बूस्टर डोस उपलब्ध आहे.
नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी असेही सांगितले की, १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी कॉर्बोव्हॅक्स लस उपलब्ध आहे. पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत एकूण ४३,३६,५७७ कोविड प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिला डोस घेणारे २१,९२,१३८ तसेच दुसरा डोस घेणारे १७,७८,४२४ नागरिकांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community