आता मुंबईतही तयार होणार कोवॅक्सिन… या संस्थेला मिळाली मान्यता!

147

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन लस बनवण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करुन केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने, महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते असे सांगून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. 

एका वर्षाची मान्यता

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरुप यांनी आज राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली आहे. कोवॅक्सिन बनवण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच, हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात म्हटले आहे.

मुख्यंमंत्र्यांच्या मागणीला मान्यता

यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले. राज्यात लसींचा मोठा तुटवडा होत असल्याने लस लवकरात लवकर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हाफकिन सारख्या संस्थांना लस निर्मितीसाठी मान्यता द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना केली होती. अखेर केंद्र सरकारच्यावतीने ही मागणी मान्य करण्यात आल्याने, लस निर्मितीला खूप मोठे बळ मिळाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.