मध्य रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते नेहमीच पसंती देतात. यंदा मध्य रेल्वेच्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर 14 चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणातून 2.36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रीकरणामध्ये 8 फीचर फिल्म्स, 3 वेबसीरिज, एक डाॅक्युमेंटरी, एक शाॅर्ट फिल्म आणि जाहिरातीसह सुमारे 14 चित्रपटांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने सर्वाधिक 1.27 कोटी रुपयांचा महसूल 2 ब्राइड्स या चित्रपटाद्वारे मिळवला आहे. कान्हेगाव स्थानकावर विशेष गाडीद्वारे 18 दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वेस्थानकावर तीन दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या शूटिंगद्वारे 29.40 लाख महसूल प्राप्त केला आहे. जानेवारी ते डिसेंबर 2022 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगद्वारे मध्य रेल्वेने रुपये 2.32 कोटी केलेली कमाई ही गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे.
सीएसएमटी हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे शूटिंग स्थान आहे. सनफिस्ट माॅम्स मॅजिकच्या जाहिरात चित्रपटासह 5 चित्रपटांचे चित्रीकरण या युनेस्कोच्या जागतिक वारसा रेल्वेस्थानकावर करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातून चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली जाते.
आतापर्यंत झालेली चित्रीकरणे
स्लम डाॅग मिलेनियर, कमिने, रब ने बना दी जोडी, रा-वन, रावन, दिलवाने दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि इतर अनेक हिट चित्रपटांचे मध्य रेल्वेवर चित्रीकरण झाले आहे.
निर्मात्यांची आवडती ठिकाणे
- पनवेलजवळील आपटा स्टेशन
- पुणे- कोल्हापूर मार्गावरील वाठार स्टेशन
- माथेरान, परळमधील सेंट्रल रेल्वे स्पोर्टस अकॅडमी काॅम्लेक्स
- दादर, कर्जत, जुनी वाडीबंदर
- अहमदनगरमधील येवला, मनमाड आणि कान्हेगाव स्टेशन
- अहमदनगर आणि आष्टी दरम्यान नवीन विभागातील नारायण डोहो यासारखे यार्ड