मध्य रेल्वेला Vistadome डब्यांतून गेल्या 4 महिन्यांत 4 कोटींची कमाई

पाचवा विस्टाडोम कोच पुणे - सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला

107

मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची श्वास रोखून धरणारी दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची विलोभनीय दृश्ये असोत, याचा अनुभव घेण्यासाठी मध्ये रेल्वेच्या काचेच्या रुंद खिडक्यांसह हे डबे प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहेत. विस्टाडोम कोचची लोकप्रियता पाहून आता मध्य रेल्वेचा पाचवा विस्टाडोम डबा पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का?)

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेसच्या व्हिस्टाडोम कोचमध्ये एप्रिल ते जुलै २०२२ या कालावधीत ३१८२१ प्रवाशांची नोंद असून रु. ३.९९ कोटी महसूलाची नोंद केली आहे.

पुणे-सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेवरील ५ वी एक्सप्रेस

२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम डबे पहिल्यांदा सादर करण्यात आले होते. या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हे डबे २६ जून २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसला जोडण्यात आले. प्रवाशांच्या प्रचंड मागणीमुळे, मध्य रेल्वेचा तिसरा विस्टाडोम कोच १५ ऑगस्ट २०२१ पासून डेक्कन क्वीनला जोडण्यात आला आणि २५ जुलै २०२२ रोजी चौथा विस्टाडोम कोच प्रगती एक्स्प्रेसला जोडण्यात आला. आता पुणे – सिकंदराबाद शताब्दीला विस्टाडोम कोच जोडण्यात आला आहे. १० ऑगस्ट २०२२ पासून विस्टाडोम कोच जोडण्यात आलेली पुणे-सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेवरील ५ वी एक्सप्रेस असणार आहे.

पुणे- सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसचे प्रवासी उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेतील, जे अनेक अंतर्देशीय आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतील. 12025 पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ६.०० वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. 12026 सिकंदराबाद – पुणे शताब्दी एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री ११.१० वाजता पुण्याला पोहोचेल.

काय आहेत वैशिष्ट्ये

अनोखे विस्टाडोम डबे, काचेचे छत असण्याव्यतिरिक्त, रुंद खिडकीचे पॅनल, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, रुंद स्लाइडिंग दरवाजे इ. अशी अनेक असामान्य वैशिष्ट्ये यात आहेत. याशिवाय वैशिष्ट्यपूर्ण व्ह्यूइंग गॅलरी सुद्धा यामध्ये आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.