रेल्वेचा अनोखा उपक्रम! आता रुळांलगत दिसणार नाही गटाराच्या पाण्याचा भाजीपाला!

मुंबई लोकलमधून प्रवास करताना, सर्वांचेच लक्ष रुळांलगतच्या जमिनीवर सांडपाण्याचा वापर करून लागवड केलेल्या भाजीपाल्याकडे जाते. अनेक ट्रॅकजवळ राहणारे लोक रुळांलगत सर्रास कचरा टाकतात किंवा बेकायदेशीरपणे भाजीपाला पिकवतात. या भाज्या आरोग्यासाठी घातक असतात. म्हणूनच रेल्वेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. सांडपाणी अथवा गटाराचे पाणी वापरुन रेल्वे रुळांलगतच्या जमिनीवर करण्यात येणारी भाजीपाला लागवड रोखण्यासाठी आणि रुळांचे सुशोभीकरण करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने, रेल्वे रुळांजवळील १५० एकर जमिनीवर फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे ट्रॅक सुशोभीकरण

खाजगी कंपनीला याचे कंत्राट दिले जाणार आहे. रेल्वे रुळांवर वेगवेगळ्या ११३ ठिकाणी १५० एकर पेक्षा अधिक जमिनीवर फुलशेती करण्यासाठी खुल्या निविदांद्वारे कंत्राट दिले जाईल आणि संबंधित कंपनी ही फुले खुल्या बाजारात विकू शकेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा प्रकारे, रेल्वे नॉन-फेअर रेव्हेन्यू (NFR) उत्पन्न करण्यास सक्षम होईल आणि रेल्वेचे ट्रॅक सुद्धा सुशोभित होतील. असेही ते म्हणाले. या संकल्पनेसाठी नाशिकस्थित सह्याद्री फार्म्स या कंपनीने रेल्वेला मदत केली आहे.

( हेही वाचा : मुंबईत भायखळा परिसरात भीषण अग्नितांडव! 8-10 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल )

मध्य रेल्वेकडे मेन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या तीन मार्गांवरील रुळांवर अनेक मोकळ्या जागा आहेत. यापैकी काही ठिकाणी ट्रॅकजवळ राहणारे लोक जमिनीवर कचरा टाकतात किंवा बेकायदेशीरपणे भाजीपाला पिकवतात. “कचरा, घाण आणि सांडपाणी नेहमीच रुळांवर दिसत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ट्रॅकच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि सुगंधित ठेवण्यासाठी फ्लोरिकल्चरची योजना आखण्यात आली आहे,” असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

…तो भाजीपाला आरोग्यासाठी घातक

१९७० मध्ये, ग्रो मोअर फूड (GMF) योजनेंतर्गत, रेल्वेने आपल्या कर्मचार्‍यांना या जमिनींवर अतिक्रमण होऊ नये म्हणून या जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची परवानगी दिली होती. गटाराच्या पाण्याचा वापर करून शेती केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे काम बंद करण्यात आले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती यानंतर न्यायालयाने २०१९ मध्ये सांडपाणी किंवा रासायनिक पाण्याचा वापर उपभोग्य वस्तूंच्या शेतीत होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर रेल्वेने शेतीसाठी परवाना देणे बंद केले. तथापि, ट्रॅकच्या कडेला अनेक पॅचवर बेकायदेशीर लागवड होत आहे आणि बाजारात त्याची विक्री अजूनही सर्रासपणे सुरू आहे. सांडपाण्याच्या पाण्याचा वापर करून पिकवलेल्या भाज्यांची मुंबईसह उपनगरात जादा दराने विक्री होते. या भाज्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याने रेल्वे बोर्डाने रेल्वेच्या जमिनीवर भाजीपाला न पिकवता फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकुर्ली येथे १२ एकर, घाटकोपर-कुर्ला येथे दोन एकर, पारसिक बोगदा परिसरातील पावणे चार एकर, कुर्ला कारशेड आणि दादर येथे अडीच एकर आणि लोकमान्य येथे दीड एकर जागा, टिळक टर्मिनस या स्थानकांवर पहिल्या टप्प्यात फुलांची लागवड केली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here