सध्या उपनगरीय सेवेत हार्बर, मध्य आणि पश्चिम मार्गावर वातानुकूलीत लोकल गाडी चालवण्यात आली. या गाडीपासून हार्बर वंचित होती, मात्र १ डिसेंबरपासून आता या मार्गावरही वातानुकूलीत लोकल गाडी चालवण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेने १ डिसेंबरपासून हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर म्हणजेच बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग यासाठी सुधारित उपनगरीय वेळापत्रक लागू करणार आहे. कोविड काळात मुंबई उपनगरीय लोकलसेवेला मोठा फटका बसला होता. त्यामुळेच रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून हार्बर मार्गासाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच वातानुकूलीत लोकल गाडी हार्बरवर १ डिसेंबरपासून ही सुरू होत असून सोमवार ते शुक्रवार दररोज एसी लोकलच्या १२ फेऱ्या होणार आहेत. त्याचवेळी अनेक लोकलसेवांचा विस्तारही करण्यात आला आहे.
(हेही वाचा आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी लावण्याची गरज! राजेश टोपेंचे मत)
हे आहेत बदल!
- हार्बर मार्गावर १२ वातानुकूलित लोकल ट्रेन सेवा १ डिसेंबरपासून.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अंधेरी सेवा आणि पनवेल -अंधेरी सर्व सेवांचा गोरेगाव स्थानकापर्यंत विस्तार.
- सीएसएमटी आणि अंधेरी दरम्यान चालणाऱ्या ४४ सेवा गोरेगावपर्यंत वाढणार, पनवेल ते अंधेरी दरम्यान चालणाऱ्या १८ सेवा गोरेगावपर्यंत विस्तारणार.
- सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे दरम्यान चालणाऱ्या २ सेवा गोरेगावपर्यंत वाढवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील एकूण सेवांची संख्या सध्याप्रमाणे ६१४ आणि ट्रान्सहार्बर मार्गावर सध्याप्रमाणे २६२ राहतील
- ठाणे येथून १०.४० वाजता सुटणारी ट्रान्सहार्बर बेलापूर लोकल आणि ठाणे येथून २३.१४ वाजता सुटणारी ट्रान्सहार्बर बेलापूर लोकल आता पनवेलपर्यंत चालविण्यात येईल.
- एसी लोकल सोमवार ते शनिवार चालतील आणि रविवारी/नामांकित सुट्टीच्या दिवशी संबंधित वेळेत सामान्य लोकल धावतील.