कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा, मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं

145

कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबई लोकलचं वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना कामावर जाण्याच्या वेळी मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत, त्यामुळे सकाळीच प्रवाशांचा रेल्वे स्टेशनवर खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

(हेही वाचा – मोदींची मोठी घोषणा! PM SHRI School योजनेंतर्गत शाळा होणार अपग्रेड, जाणून घ्या वैशिष्ट्ये)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण जवळील पत्रिपुलाजवळ रूळाला तडा गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली, त्यामुळे इंद्रायणी एक्स्प्रेससह अन्य लांबपल्याच्या गाड्या ठाकुर्ली, डोंबिवली दिवा मार्गावर खोळंबल्या होत्या. एका लाईनमनच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असून त्याला रेल्वे रूळाला तडा गेल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पातळीवर सूचित करून पुढील धोका टाळण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे लांबपल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतूक तातडीने थांबवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

घटनास्थळी रेल्वेचे तांत्रिक विभागाचे कर्मचारी दाखल होत त्यांनी ट्रॅक दुरुस्ती केली आणि सकाळी ७.१५ च्या सुमारास वाहतूक सुरू झाली. त्यानंतर हळूहळू डाऊन जलद मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र तरी सकाळच्या या घटनेमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. तर लांबपल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणारे प्रवासी स्टेशनवरच ताटकळले, त्यामुळे कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.