आता Indian Railways ची ‘Queen’ होणार हायटेक, नव्या रुपात सुपरफास्ट धावणार!

मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांनी एलएचबी डब्यांसह नवीन डेक्कन क्वीन ट्रेनची केली पाहणी

130

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एलएचबी डब्यांसह नवीन डेक्कन क्वीन ट्रेनची पाहणी केली. या ट्रेनने आपली गौरवशाली 92 वर्षे पूर्ण करून 93 व्या वर्षात प्रवेश केला आहे. दरम्यान, महाव्यवस्थापकांनी यावेळी सामान्य द्वितीय श्रेणी, एसी चेअर कार, व्हिस्टाडोम कोच आणि डायनिंग कार आणि किचनची तपासणी केली. त्यामुळे आता लवकरच भारतीय रेल्वेची क्वीन अर्थात डेक्कन क्वीन हायटेक होणार असून नव्या रूपात सुपरफास्ट धावणार आहे.

सुरक्षित, आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळणार

महाव्यवस्थापकांनी असे सांगितले की, “डेक्कन क्वीन ही सर्वात प्रतिष्ठित ट्रेन आहे जी गेल्या 92 वर्षांपासून यशस्वीपणे धावत आहे. भारतीय रेल्वेवर रेस्टॉरंट कार असणारी ही अशा प्रकारची एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन आता दिनांक 22.06.2022 पासून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. डायनिंग कार आणि बाह्य डिझाइनची रचना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (NID), अहमदाबाद यांनी रेल्वे बोर्ड, संशोधन, डिझाइन आणि मानक संस्था (RDSO), इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नई, मध्य रेल्वे यांच्या समन्वयाने आणि सामान्य जनतेच्या सूचना विचारात घेऊन केली आहे. एलएचबी डब्यांची सुरुवात म्हणजे अधिक सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देणारी असेल असेही त्यांनी सांगितले.

‘डेक्कन क्वीन’बद्दल…

‘डेक्कन क्वीन’ ची सुरुवात दिनांक 1 जून 1930 रोजी झाली जी मध्य रेल्वेची अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक प्रमुख महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील 2 महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल झालेली ही पहिली डिलक्स ट्रेन होती, म्हणजे मुंबई आणि पुणे आणि तिला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असे नाव देण्यात आले.

(हेही वाचा – लेजेंडरी Deccan Queen ला 92 तर Punjab Mail एक्स्प्रेसला 110 वर्षे पूर्ण!)

अशी असणार एलएचबी डब्यांसह सुधारित रचना

सुरुवातीला, फक्त फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासची सोय असलेल्या 7 डब्यांची ट्रेन सुरू करण्यात आली होती. तिसरा वर्ग 1955 मध्ये सुरू करण्यात आला. मूळ रेकचे डबे 1966 मध्ये इंटीग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर यांनी बांधलेले अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडीड इंटिग्रल कोचने बदलले आणि डब्यांची संख्या 12 करण्यात आली. विस्टाडोम कोच दिनांक 15.8.2021 पासून जोडण्यात आला. दिनांक 22.6.2022 पासून एलएचबी डब्यांसह सुधारित रचना : चार एसी चेअर कार, 8 द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार अशी असणार आहे.

मुकुल जैन, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मणिजीत सिंग, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, ए के गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग तसेच मध्य रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.