बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण’ येथील जलाशयामध्ये १०० मेगावॅट क्षमतेच्या संकरित अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारणी संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका व खाजगी भागीदार यांच्यादरम्यान ऊर्जा खरेदी करारावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला.
मुंबईकरांच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिलेले एका स्वप्न साकार होत आहे. मध्य वैतरणा धरणाच्या बांधकामाच्या वेळी दोन-तीन वेळा त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वात जलद गतीने बांधकाम झालेले हे जगातील ०९ व्या क्रमांकाचे धरण असल्याचा मला अभिमान आहे. २०१७ च्या वचननाम्यात जी वचने दिली होती त्यातील एक हे वचन होते. या धरणावर ‘हायड्रो इलेक्ट्रिसिटी’ तयार होऊ शकते, असे लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासोबत चर्चा करून मुंबईकरांना आणखी काय चांगले देता येईल यादृष्टीने टाकलेले एक पाऊल होते
करार करण्यात आलेल्या प्रकल्पातील तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पामधून ८० मेगावॅट व जलविद्युत प्रकल्पामधून २० मेगावॅट ऊर्जा प्राप्त होणार आहे. सन २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे निर्धारित करण्यात आले असून या कामाच्या गती बाबत दर आठवड्याला होणाऱ्या आढावा बैठकीत चर्चा व निर्णय घेतले जाणार आहेत. जेणेकरून येत्या सहा महिन्यांमध्ये निर्धारित वेळेत या कामाचे भूमिपूजन करणे शक्य होऊ शकेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व मुख्यमंत्री उद्धवसाहेब यांनी केलेले काम पुढे न्यायचे आहे. या कामाच्या माध्यमातून कार्बन विघटन व पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने आपण एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. या संपूर्ण कामासाठी कार्यरत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करीत असल्याचे ते म्हणाले.
ऊर्जा निर्मितीचे काम करणारी देशातील एकमेव महापालिका
महापौर किशोरी पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांनी देशाला दिशा दिली. त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज हा करार होत आहे, याचा आनंद आहे. ऊर्जा निर्मितीचे काम करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महापालिका असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण कामाचे श्रेय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दूरदृष्टीला व भविष्यातील नियोजनाला जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘पुढील २५ वर्षांमध्ये मुंबईकरांना आपण नवीन काय देऊ शकतो?’ याबाबत सतत कार्यप्रवण जाणीव असणाऱ्या बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे व त्यानंतर आता आदित्य ठाकरे ही नेते मंडळी आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मुंबईतील रस्ते, पाणी, शिक्षण तसेच त्यांच्या मतदारसंघा सोबतच इतर लहान – मोठ्या कामांवर त्यांचे बारीक लक्ष असते. आम्हाला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे. कुठल्याही विषयांमध्ये आम्ही प्रथम धावून जाऊ, नंतर आपण असा आपल्याला विश्वास देत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर एडव्होकेट सुहास वाडकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मलबार हिल परिसरातील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प ) पी. वेलरासू, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोड, पाणी पुरवठा प्रकल्प खात्याचे प्रमुख अभियंता वसंत गायकवाड, संबंधित भागिदार कंपनीचे अधिकारी रेबी थॉमस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सौर ऊर्जा व जलविद्युत प्रकल्प बाबत थोडक्यात माहिती
• हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून होणार १०० मेगावॅट विद्युत निर्मिती संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका.
• २० मेगावॅट जलविद्युत, तर ८० मेगावॅट तरंगती सौर ऊर्जा; अशी एकूण १०० मेगावॅट क्षमता.
• दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जा निर्मिती या प्रकल्पाद्वारे होईल. ज्यामुळे महानगरपालिकेच्या वीज खर्चात प्रतिवर्षी २३ ते २५ कोटींची बचत साध्य होईल.
• मध्य वैतरणा जल विद्युत प्रकल्प विकसित करण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाद्वारे दि. १२ डिसेंबर २०१९ रोजी प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेची असणारी वीजेची मोठी मागणी लक्षात घेता, “बांधा – वित्तपुरवठा करा – वापरा व हस्तांतरित करा” या तत्वावर जलविद्युत निर्मितीसह सौर ऊर्जा निर्मितीही करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘कॅप्टीव्ह पॉवर प्रोड्युसर मॉडेल’नुसार ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ येथे २० मेगॅवॅट क्षमतेचा जलविद्युत, तर ८० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर ऊर्जा असा एकूण १०० मेगावॅट क्षमतेचा संकरित वीज निर्मिती प्रकल्प विकसित होणार आहे.
• या प्रकल्पामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका ही संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन २०१४ मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले.
• या धरणाचे ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे नामकरण देखील करण्यात आले आहे.
• धरणाच्या निर्मितीवेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टिने पाणीपुरवठा तसेच जलविद्युत निर्मितीसाठी संयुक्तिक बर्हिगामी जलवाहिनी देखील टाकण्यात आली होती.
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने हा जल व सौर असा संकरित ऊर्जा निर्मिती प्रकल्प विकसित करण्यास तसेच ४ रुपये ७५ पैसे प्रतियुनिट या दराने पुढील २५ वर्षासाठी वीज खरेदी करार करण्यास दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी मंजूरी प्रदान केली आहे.
• भागिदारी पद्धतीने होणाऱ्या या प्रकल्पाच्या करारानुसार हा प्रकल्प उभारण्यासाठीचा सर्व भांडवली खर्च हा संबंधित भागिदार कंपनीद्वारे करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community