Agnipath Scheme: केंद्रीय गृहमंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी एक मोठा निर्णय

'अग्निवीरां'साठी निमलष्करी दलात 10 टक्के कोटा

केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत 13 राज्यांमध्ये विरोध होताना दिसत आहे. याचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य भरतीची तयारी करणारे रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करत आहेत.  अशातच केंद्रीय गृहमंत्रालयाचा अग्निवीरांसाठी आणखी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.

(हेही वाचा – राज ठाकरे लिलावतीत दाखल होणार, रविवारी शस्त्रक्रिया)

अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

उच्च वयोमर्यादेच्या पुढे 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल

अग्निवीरांना उपरोक्त दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्र सरकारनं लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्यानं भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु, गेली 2 वर्षे भारतीय सैन्यात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे केंद्र सरकारने 2022 साठी प्रस्तावित सैन्य भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे अशी करण्यात आली आहे.

भरतीचे नोटिफिकेशन लवकरच होणार जाहीर

अग्निवीरांसाठी भरतीचे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती केंद्रीय थलसेना प्रमुख मनोज पांडे यांनी शुक्रवारी दिली आहे. ‘2022 मधील भरतीसाठी वयोमर्यादा 23 वर्ष करण्याचा सरकारचा निर्णय आम्हाला मिळाला आहे. कोरोना महामारीच्या काळातही जे भर्ती परीक्षेसाठी तयारी करत होते अशा तरूणांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पुढील 2 दिवसांमध्ये http://joinindianarmy.nic.in नोटीफिकेशन जारी करण्यात येणार आहे. त्यानंतर सेना भरतीबाबतचा विस्तृत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. डिसेंबर 2022 पूर्वी अग्नीविरांची पहिल्या बॅचचं प्रशिक्षण सुरू होईल.’ भारतीय सेनेत सहभागी होण्याची मोठी संधी यामधून प्राप्त झाली आहे, त्याचा फायदा घेण्याचे आवाहन सैन्य प्रमुखांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here