उस्मानाबाद शहराचे नाव बदलून धाराशिव करण्यास परवानगी दिल्याची माहिती केंद्र सरकारकडून बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली गेली. मात्र औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याबाबतची मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अद्याप सुरुच असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
गेल्या महिन्यात मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला विचारले होते की, महाराष्ट्र सरकारकडून उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहरांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आला आहे का? आणि तसे असल्यास हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे का?
त्यानंतर बुधवारी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव प्राप्त झाला आहे. केंद्राने २ फेब्रुवारीलाच उस्मानाबादचे नाव बदलण्याबाबत राज्य सरकारला हरकत नसल्याचे कळवले होते. परंतु केंद्राने औरंगाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.’ केंद्राची ही बाजू ऐकून मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.
दरम्यान उस्मानाबादचे धाराशिव असे, तर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला जुलै २०२२मध्ये मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मोहम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे या तिघांनी ही याचिका दाखल केली होती.
(हेही वाचा – विशेष मुलांचे अर्ली इंटरव्हेंन्शन सेंटर लवकरच होणार सुरु : अतिरिक्त कामांसाठी दीड कोटींचा खर्च…)
Join Our WhatsApp Community