परिचारिकांच्या धुलाई भत्त्यावर केंद्राकडून सर्फ पावडर तर राज्याकडून माती – दरेकर

129

परिचारिकांना समाजात सन्मानपूर्वक मान मिळाला पाहिजे. त्यांचे पदनाम सन्मानाने घेतले जावे. परिचारिकांच्या मागण्यांकडे सरकारकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. परिचारिकांच्या धुलाई भत्त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्फ पावडर तर राज्याकडून माती दिली जात आहे, या तीव्र शब्दांत दरेकर यांनी टीका केली. आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गेल्या चार दिवसांपासून आझाद मैदानात एल्गार पुकारलेल्या परिचारिकांच्या आंदोलनाला भाजपकडून पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज परिचारिकांना भेट दिली. परिचारिकांच्या समस्या मांडताना मला राजकारण करायचे नाही. सरकारशी राजकारण करायला इतर अनेक विषय आहेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

( हेही वाचा : सरकारने परिचारिकांना संकटकाळात देवदूत बोलण्याचे नाटक केले – प्रवीण दरेकर)

भाजपच्या वतीने सर्वतोपरी पाठिंबा देऊनही गेल्या दोन वर्षांपूर्वी आंदोलने करुनही परिचारिकांचे प्रश्न सरकारी पातळीवर अद्याप सुटलेले नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. प्रशासकीय पातळीवर महिलांचा मोठ्या संख्येने भरणा असलेल्या या क्षेत्रातील समस्येला तसेच इतर आर्थिक गणितांशी संबंधित मागण्यांबाबत चर्चेसाठी सरकारच्या वतीने आंदोलनाचे चार दिवस उलटले, तरीही कोणीही अधिकारी चर्चेसाठी आला नाही, याबाबत खंत व्यक्त केली. सरकारला गांभीर्य नसल्यानेच आंदोलने आणि दुर्लक्षित वर्गाच्या मागण्यांबाबत समजून घेणे हे माझे काम आणि माझी जबाबदारी असल्याचा टोलाही दरेकर यांनी लगावला.

अगोदर प्रेमाचे पत्र नंतर दणका

परिचारिकांच्या धुलाई भत्त्यासाठी केंद्राकडून १२०० तर राज्यसरकारडून २०० रुपये दिले जात असल्याची माहिती दरेकर यांनी दिली. दोन्ही किंमतीत प्रचंड तफावत आहे. जोखीम भत्त्याबाबतही राज्य सरकार परिचारिकांना गृहित धरत आहे. परिचारिकांच्या मागण्यांबाबत सरकारला आम्ही अगोदर प्रेमाचे पत्र देऊ, त्यानंतरही सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही दणका देऊ, असा इशारा दरेकर यांनी दिला.

परिचारिका आणि सरकारची संयुक्त बैठक घ्यायला लावू

मी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारने अर्थमंत्री अजित पवार तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी परिचारिकांच्या प्रतिनिधींशी बैठक बोलावून चर्चा घडवली जाईल. सरकार टोलवाटोलवी करण्यात हुशार आहे. सर्वांनी बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल, अशी भूमिका घ्यायला हवी, असेही ते म्हणाले. परिचारिकांच्या समस्येचा विचार करताना त्यांचा पगार, वाढलेली महागाई याचा विचार करणे राज्यकर्त्यांचे काम आहे. परिचारिकांच्याबाबतीत कृतज्ञतेची भावना गेली, या शब्दांत दरेकर यांनी टीका केली. कोरोनांतर परिचारिकांमधील देवदूत सरकारच्या नजरेतून गेला. परिचारिकांना वाहिलेली फुले, पुरस्कारही गेले. परिचारिकांच्या न्यायहक्कांच्यावेळी कृतज्ञतेची भावना जाता कामा नये, असे ते म्हणाले.

प्रवीण दरेकर का म्हणाले महाविकास आघाडीला काम आळशी

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या तीन मंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात खेचत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात सरकारविरोधात फटकेबाजी केली. परिचारिकांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला गांभीर्यता नसल्याने  आळशी सरकारला आम्हालाच हलवावे लागणार, अशी टीका दरेकर यांनी केली. राज्यात प्रलंबित ७५० नियुक्त पोलिस भरतीला लागलेला ब्रेक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निकाली लागला. सरकारची इच्छा असेल तर कायदा मोडून, वाकवूनही मदत करता येते, असा टोलाही दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या सरकारला लगावला. परिचारिका आझाद मैदानात कोणत्या कारणासाठी आल्या आहेत. एखादा अधिकारी पाठवून परिचारिकांची समस्या समजावून घ्यावी, मागण्यांबाबत आवश्यक उपाययोजनांची तरतूद किंवा मर्यादा याबाबत परिचारिकांना समजवायला एकही सरकारी अधिकारी आला नाही. या सरकारला परिचारिकांबाबत संवेदना नाही, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.