चंद्रयान -३ (Chandrayan-3) उतरताना बुधवारी काही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. पुढील दोन दिवस, चांद्रयानावर सातत्याने देखरेख ठेवली जाईल. चंद्रावर उतरण्यासंदर्भातला सर्व कार्यक्रम दोन दिवस आधी लोड केला जाईल आणि त्याचे परीक्षण केले जाईल तसेच चंद्रयान-३,चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली अंतराळ मोहिमांचा एक नवा इतिहास घडवला जाईल असा विश्वास इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी व्यक्त केला.
इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव डॉ. एस सोमनाथ यांनी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणूऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची आज नवी दिल्ली इथे भेट घेतली आणि त्यांना चंद्रयान 3 च्या चंद्रावर उतरण्या संदर्भातली सद्यस्थिती आणि सज्जता याविषयी माहिती दिली. नियोजित कार्यक्रमानुसार इस्रोने दिलेल्या माहितीनुसार चंद्रयान -३, चंद्रावर २३ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६.०४ वाजता उतरण्यास सज्ज आहे. सर्व प्रणाली योग्य रीतीने काम करत असल्याचेही त्यांनी संगितले.
चंद्रयान-२ मोहीम पूर्णपणे यशस्वी होऊ शकली नाही कारण हार्ड लँडिंगमुळे यानाशी असलेला संपर्क तुटला होता. यावेळी चंद्रयान -३, लँडर मोड्यूल आणि अजूनही कक्षेत भ्रमण करत असलेल्या चंद्रयान-२ ऑर्बिटर यांच्यात दुहेरी संपर्क राखण्यात इस्रो यशस्वी झाली आहे. सोमवारी चंद्रयान -३ ने टिपलेली चंद्राच्या दुरवरच्या भागातील छायाचित्रे प्रसिद्ध केली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिलाच देश
अमेरिका, रशिया आणि चीन नंतर चंद्रावर आपले यान पाठवणारा भारत जगातला चौथा देश ठरेल, मात्र, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश असेल.
(हेही वाचा :CBI : सीबीआयची 6,841 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित)
चंद्रयान -३ ची मुख्य उद्दिष्टे
१) चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग म्हणजेच अलगद उतरणे
२) चंद्रावर रोव्हर रोविंग आणि तिथे स्थापित होऊन वैज्ञानिक प्रयोग करणे.
डॉ. जितेंद्र सिंह यांनी चंद्रयान मालिकेतील पहिले यान म्हणजेच चंद्रयान १ ची आठवण सांगताना ते म्हणाले की, या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचा शोध लावला होता, जी संपूर्ण जगासाठी एक नवी माहिती होती आणि जगातील सर्वात प्रमुख म्हणवली जाणारी अमेरिकेची अवकाश संस्था नासा सुद्धा या शोधामुळे आश्चर्यचकित झाली होती तसेच, या माहितीचा त्यांनी त्यांच्या पुढच्या प्रयोगांमधे उपयोग केला होता, असे डॉ. सिंह यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community