फेसबूकवरील मित्राच्या ‘फेक’ बोलण्याला महिला पोलिस अधिकारी भुलली! आणि मग…

या इसमाने तो बँकेत अधिकारी असल्याचे सांगून, या महिलेशी जवळीक साधली आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आणि मग केले असे काही...

पोलिस अधिकारी असलेल्या महिलेला फेसबूक वरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. बँकेत अधिकारी असलेला तिचा फेसबूकवरील फेक मित्र, या पोलिस अधिकारी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिला ब्लॅकमेल करत होता. असे या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी हा गुन्हा एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

फेसबूकवर ‘फेका-फेकी’

पीडित महिला पोलिस अधिकारी ही मुंबई पोलिस दलात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर आहे. वर्षभरापूर्वी या पोलिस अधिकारी महिलेची फेसबूकवर औरंगाबाद येथे राहणाऱ्या एका इसमासोबत मैत्री झाली होती. या इसमाने तो बँकेत अधिकारी असल्याचे सांगून, या महिलेशी जवळीक साधली आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. भेटी दरम्यान या आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार त्याने दोघांच्या शारीरिक संबंधांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि त्यामार्फत ब्लॅकमेल करुन तिला धमकी देण्यास सुरुवात केली.

पोलिस घेत आहेत शोध

अखेर त्याच्या या त्रासाला कंटाळून या पीडित पोलिस अधिकारी महिलेने मेघवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मेघवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन, हा गुन्हा पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वर्ग केला आहे. याप्रकरणी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसली तरी लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here