मालकाचे जवळपास ६० लाख रुपयांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या नोकराला चेंबूर पोलिसांनी ४८ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याजवळून ४७ लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा नोकर दोन दिवसांपासून ९०२ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० लाख रुपयांची रोकड सोबत ठेवून डान्सबारमध्ये दौलतजादा करीत होता अशी माहिती समोर आली. पोलिसांनी अटक केलेल्या नोकराकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले मात्र त्यातील काही दागिने विकून मिळवलेली १० लाख रुपयांची रोकड सापडलेली नाही. ही रक्कम बारबालावर उडवली की काय? अशी शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे.
चेंबूर परिसरातील एका सुवर्णकाराने ८ मार्च रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात नोकराविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सुरेश गुर्जर हा नोकर मालकाच्या पश्चात दुकानातील ५७ लाखांचे दागिने घेऊन पळून गेला असून त्याचा कुठेही संपर्क होत नसल्याचे तक्रारीत म्हटले होते. एवढ्या मोठ्या रकमेचे दागिने घेऊन नोकराने पोबारा केल्यामुळे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून नोकराच्या शोधासाठी पोलीस पथक गठीत केले.
परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत, चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. एकनाथ देसाई,अनिल शिरोळे पो.उ.नि.स्वप्नील शिंदे,सपोउनि.घुले,नार्वेकर, अंमलदार. घोरपडे, चव्हाण, परदेशी, कदम चौधरी, लोंढे, भक्ती जाधव आणि पथक यांनी नोकराचा शोध सुरू केला,नोकर सुरेश गुर्जर (२५) हा मुंबईच्या जवळपास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिकरित्या तपास करून नोकर सुरेश गुर्जर याला सोमवारी नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले.
चेंबूर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी प्रथम त्याची बॅग तपासली असता बॅगेत दागिने सापडल्याने पोलीसांनी त्याच्याकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. परंतु, दागिने कुठे आहेत हे मी मालकांना सांगेल असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याच्या मालकाला बोलावून त्याच्यासमोर चौकशी केली असता त्याने अंगावरील शर्ट काढताच पोलीस अचंबित होऊन त्याच्याकडे बघू लागले. त्याने ४७ लाख रुपयांचे दागिने शर्टाच्या आत घातलेल्या बंडीतील विशेष कप्प्यात लपवून ठेवले होते. पोलिसांनी डोक्याला हात मारत एवढा वेळ आम्ही दागिने बॅगेत शोधत होतो आणि तेच दागिने त्याच्या अंगात सापडल्याचे सांगितले.
४७ लाख रुपये किमतीचे दागिने सापडले मात्र उर्वरित दागिने कुठे आहेत,याबाबत त्याच्याकडे चौकशी करण्यात आली असता, त्यातील काही दागिने ज्या व्यापाऱ्याला द्यायचे होते त्यांना देऊन त्यांच्याकडून १० लाख रुपये रोखीने घेतले असे त्याने सांगितले. मग ते दहा लाख रुपयांची रोकड काय केलीस? असे पोलिसांनी त्याला विचारले मात्र तो त्या रकमेचे काय झाले हे काहीच सांगू शकला नाही.
तपास पथकाने नोकर सुरेश गुर्जर याला विश्वासात घेऊन झालेला सर्व प्रकार विचारला असता, मालक चार दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी तयार केलेले ऑर्डरचे दागिने सोनारांना देण्यास सांगितले होते. त्यापैकी काही दागिने सोनारांना दिले व रोकड घेऊन दारू पिण्यासाठी डान्सबारमध्ये गेलो. तेथे काही रक्कम उडवली. मात्र, मालकाला काय उत्तर द्यायचे म्हणून दुसऱ्या दिवशी बाकीचे सर्व दागिने बंडीच्या कप्प्यात ठेवले व दागिन्यांसह तो पुन्हा डान्सबारमध्ये गेला होता. तसेच, दागिने घेऊन चार दिवस मोबाईल फोन स्विच ऑफ करून फिरत होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. बारमध्ये किती पैसे उडवले, व उर्वरित रक्कम कुठे ठेवली याबाबत तो पोलिसांना काहीही माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.