… आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार लंडनला गेली!

245

छत्रपती शिवाजी महाराज… महाराष्ट्राचं आराध्य दैवत…शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी ज्या तलवारीनं पराक्रम गाजवला, ती तलवार सध्या परदेशात आहे. या तलवारीचं नाव आहे जगदंबा तलवार. ही जगदंबा तलवार २०२४ पर्यंत महाराष्ट्रात परत आणणार, असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

इंग्लंडच्या राजाला कुणी दिली तलवार?

सध्या ही तलवार लंडनमध्ये असून ती ब्रिटनच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयातील रॉयल कलेक्शनमध्ये ठेवण्यात आली आहे. मात्र ही तलवार इंग्लंडला कशी पोहोचली. यामागे सुद्धा एक कहाणी आहे. ऑक्टोबर १८७५ मध्ये ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स भारतभेटीवर आला होता. यावेळी त्याला भारतातील राजे-रजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्यात. त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते. यावेळी दिलेल्या भेटवस्तूंमध्ये एक तलवार आणि एक कट्यार असून हीच ती महाराजांनी वापरलेली जगदंबा तलवार होती.

shivaji maharaj2

प्रिन्स ऑफ वेल्सला जुनी शस्त्रं गोळा करण्याची आवड होती. १८७५ मध्ये त्याने भारत भेटीवर असताना राजे-महाराजांकडून अनेक शस्त्रं नेली. यामध्ये त्यांच्याकडून ही जगदंबा तलवार जबरदस्तीने भेट म्हणून नेली. या भेटीदरम्यान नजराणा म्हणून मिळालेल्या वस्तूंची एक यादी तयार करण्यात आली आणि या मौल्यवान वस्तूंची नोंद असलेला कॅटलॉग पुढे ‘Catalogue of the collection of Indian arms and objects of art’ या नावाने प्रकाशित करण्यात आला. या कॅटलॉगमध्ये चौथे शिवाजी महाराज यांनी भेट म्हणून दिलेली तलवार मराठा स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती, अशी स्पष्ट नोंद करण्यात आली आहे.

अशी आहे जगदंबा तलवार

इंग्लंडमधील साऊथ केन्स्टिंग गॉन म्युझिअमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी संग्रहालयातील भारतीय शस्त्रांची यादी तयार केली आहे. ज्यामध्ये जंगदंबा तलवारीच्या फोटोसह माहिती आहे.

  • जुनी युरोपियन एकपाती सरळ मराठा तलवार
  • या तलवारीच्या दोन्ही बाजूला खोबणी
  • तलवारीजवळच्या मुठीजवळच्या गजावर सोन्यामध्ये फुलांचे नक्षीकाम
  • या तलावरीची मूठ लोखंडी असून त्याला गोलाकार परज आहे
  • शेवटचं टोक अणकुचीदार, त्यावर भरीव फुलांची नक्षी आणि हिरे माणिकांची सजावट आहे.
  • ही तलवार मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी असून तसा उल्लेखही करण्यात आलाय.

जगदंबा तलवार भारतात परत आणण्यासाठी याआधीही प्रयत्न झाले, मात्र त्याला कोणतेही यश आले नाही. १५० वर्षांच्या राजवटीत ब्रिटीशांनी भारतातील अनेक ऐतिहासिक वस्तू इंग्लंडला नेल्यात. यातील काही वस्तू या भेट म्हणून दिल्या गेल्या होत्या तर काही चक्क लुटून नेल्या होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.