दसरा मेळावा उद्धव ठाकरे ‘असा’ गाजवणार!

दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करतील.

85

दसरा मेळावा…शिवसैनिकांसाठी एक उत्सव. दसऱ्याला शिवसैनिक मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर विचारांचे सोने लुटण्यासाठी येत असतात. याच दसरा मेळाव्यात आधी बाळसाहेब ठाकरे आपल्या ठाकरे शैलीने विरोधकांना झोडायचे, आता तेच काम त्यांचे चिरंजीव आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. गेल्यावर्षी कोराेनामुळे ऑनलाईन पद्धतीने दसरा मेळावा पार पडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि विशेषत: राज्यपालांचा खरपूस समाचार घेतला होता. यंदा दसरा मेळावा प्रत्यक्षात होणार असल्याचे जरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले असले, तरी तो कुठे होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याला विशेष महत्व आहे. त्याचे कारण म्हणजे राज्यातील पालिकांच्या निवडणुका…नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच मुंबई महानगर पालिकेसह राज्यातल्या पालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा हा दसरा मेळावा गाजण्याची चिन्हे आहे. दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकत शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्याचे काम करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके कोणत्या विषयावर बोट ठेवण्याची शक्यता आहे, याचा आढावा घेणार हा रिपोर्ट.

मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा

मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार ती मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्यावर. भाजपाने मुंबईतील मराठी मतदारांना साद घालण्यासाठी मराठी कट्ट्यांचे आयोजन केले आहे. त्यातच भाजपा सातत्याने हिंदुत्वावरून शिवसेनेला डिवचत आहे. पालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा जोरदार गाजेल. याचमुळे मुख्यमंत्री मराठी आणि हिंदुत्व यावर आपली भूमिका मांडत भाजपाचा खरपूस समाचार घेतील. एवढेच नाही तर यावेळी ते मनसेच्या भूमिकेवर देखील अप्रत्यक्ष टिका करतील, असे बोलले जात आहे.

ईडीसह सोमय्यांचाही घेणार समाचार

सध्या राज्यात ईडीची कारवाई जोरदार सुरु असून, शिवसेनेचे सर्वाधिक नेते हे ईडीच्या रडारवर आहेत. त्यातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करत आहेत. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आपल्या भाषणातून हल्ला करण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर भाजपा केंद्रीय यंत्रणांचा कसा गैरवापर करते यावर देखील मुख्यमंत्री बोट ठेवतील.

त्या कथित फोनवरुन करणार कानउघाडणी?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजीमंत्री रामदास कदम यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल झालेल्या कथित क्लिपमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या सर्व प्रकरणामुळे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असून, रामदास कदम यांच्याावर कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर अनंत गिते यांच्या देखील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ठिणगी पडली होती. त्यामुळे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री या जुन्या शिवसैनिकांची कानउघडणी करण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : शिवसेनेची मैदानात धाव!)

युपीतल्या ‘त्या’ घटनेवरून भाजपाला झोडणार

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याची घटना घडल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले असून, भाजपावर यावरून विरोधक टिका करत आहेत. महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटले असून, ठाकरे सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. येत्या दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरे यावरुन मोदी, योगी तसेच भाजपच्या नेत्यांवर टीका करण्याची शक्यता आहे.

राज्यपालांवर निशाणा साधणार का?

गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. काळी टोपी घालणाऱ्यांच्या टोपी खाली जर डोके असेल तर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्वाबद्दल जे काय म्हटले आहे, ते नीट समजून घ्यावे. नुसते मंदिरात जाऊन घंटा बडवणे याला हिंदुत्व म्हणत नाहीत, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यामुळे यावेळी देखील मुख्यमंत्री राज्यपालांवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर टिका करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.