मुंबईतून मुले चोरी करून दिल्लीत त्यांना भिख मागण्यासाठी लावणाऱ्या मायलेकींना दिल्लीला पळून जात असताना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या जवळून एका ३ वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात आली आहे. मुंबईतून मुले चोरी करून दिल्लीत भिख मागणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेल्या महिलेने पोलिसांना कबुली दिली आहे. आई आणि दोन अल्पवयीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुलींची रवानगी महिला बालसुधारगृहात केली आहे.
या घटनेने नव्वदीच्या दशकात संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अंजनाबाई गावित प्रकरणाची आठवण करून दिली आहे. या प्रकरणात दोन मुली आणि आई या तिघी राज्यातील अनेक ठिकाणी मुलांची चोरी करून त्यांना भिख मागायला लावायच्या. मुलांनी त्रास दिल्यावर या मायलेकींनी अनेक मुलांना जमिनीवर आपटून हत्या केली होती.
पोलिसांनी ‘त्या’ तिघींना ताब्यात घेतले
बोरीवली रेल्वे स्थानकातील रेल्वे पुलावरून एक ३ वर्षांचे मूल चोरीला गेल्याची तक्रार एका मातेने बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या तीन वर्षांच्या मुलाला आणि एका १० वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन जात असताना दिसली, तेथून पुढे या मुलीने या मुलाला एका १७ वर्षांच्या मुलीकडे सोपवले. या दोघींनी तेथून एका महिलेकडे मुले सोपवून दादरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या. बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हाती हे सर्व सीसीटीव्ही फुटेज लागल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दादरकडे धाव घेऊन या महिलेचा शोध सुरू केला असता ही महिला आणि तिच्या दोन मुली दिल्लीकडे जाणाऱ्या गाडीत बसत असताना पोलिसांनी त्या तिघींना ताब्यात घेऊन त्याच्या तावडीत असलेल्या ३ वर्षांच्या मुलाची सुटका केली.
या तिघींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता या तिघी दिल्ली येथे राहणाऱ्या असल्याचे समोर आले, तसेच दिल्लीत त्या भिख मागण्याचा धंदा करतात भिख मागण्यासाठी लहान मुलांना अधिक मागणी असल्यामुळे त्या मुंबईत लहान मुले चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या होत्या आणि मुले चोरी करून ती मुले दिल्लीतील भिख मागणाऱ्या टोळीला ५० हजार रुपयांत विकणार होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई रेल्वे पोलीस दिल्लीत जाऊन चौकशी करणार
बोरिवली रेल्वे पोलिसांनी या महिलेला अपहरणाचा गुन्ह्यात अटक केली असून तिच्या दोन्ही अल्पवयीन मुलींची रवानगी डोंगरातील महिला बालसुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार या महिलेने आपल्या दोन अल्पवयीन मुलीच्या मदतीने यापूर्वी देखील या प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्या अनुषंगाने तिच्याकडे तपास सुरू आहे, तसेच मुंबई शहर तसेच रेल्वेच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मुलाचा आणि अटक करण्यात आलेल्या महिलेचा काही संबंध आहे का, हे तपासले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई रेल्वे पोलिसांचे तपास पथक दिल्ली येथे जाऊन या महिलेबाबत माहिती काढणार असून या महिलेवर दिल्लीत गुन्हे दाखल आहे का, याची चौकशी करण्यात येणार आहे, तसेच ज्या टोळीला मुलाची विक्री करणार होते त्या टोळीचा शोध घेण्यात येणार असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community