शाळेच्या नावाने मुलांना का येतोय पॅनिक अटॅक?

121

कोरोनाकाळात तब्बल दोन वर्ष घरात कोंडलेल्या मुलांना आता शाळा नकोशी झाली आहे. या मुलांना घरातच पालकांच्या सहवासात राहण्याची सवय झाल्याने शाळेच्या नावानेच मुलांना पॅनिक अटॅक येऊ लागले आहेत. शाळेच्या नावे मुलांच्या पोटात दुखू लागते, डोके दुखू लागते. शाळेतून बाहेर येताच मुलांचे दुखणे जात असल्याने शाळेची भीती मुलांमध्ये निर्माण झाल्याचा निष्कर्ष इंडियन अकॅडमी ऑफ पिडिएट्रीक्स या बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने काढला. मुलांना न्यू नॉर्मल आयुष्यात बाह्य वातावरणात समरस होता येत नसल्याने मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात पहिल्या-दुस-या क्रमांकाचा पालकांनी हट्ट बाळगू नका, असे आवाहनही बालरोगतज्ज्ञांनी केले.

ऑनलाईन शिक्षणकाळात स्क्रीनटाईम वाढल्याचे दुष्परिणाम आता शाळा पूर्णवेळ सुरु झाल्यानंतर दिसू लागले. गेल्या तीन-चार महिन्यांत दर दिवसाला लहान मुळे डोकेदुखी, पोटदुखी तसेच भयभीत होऊन आमच्या दवाखान्यापर्यंत येतात. शरीराची दुखणी शाळा सुरु होण्यापूर्वी सुरु होतात. शाळेत पालकांनी जबरदस्ती पाठवल्यास मुलांची अगोदरच रडारड सुरु होते. रात्रीची झोप उडते. शाळेत पोहोचल्यानंतर मुलांची दुखणी सुरु होतात. शिक्षक मुलांच्या तब्येतीला घाबरुन पालक आणि डॉक्टरांना कळवतात. मूल शाळेच्या आवाराबाहेर पडले की दवाखान्यात येईपर्यंत नॉर्मल होतात, हे निरीक्षण आम्ही नोंदवत आहोत, अशी माहिती इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियनच्या मुंबई शाखेचे सदस्य आणि न्यूऑन क्रिटीकेअर रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश कास्ला यांनी दिली.

तीन ते दहा या वयोगटात शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ होत असल्याबाबत बालरोगतज्ज्ञांचे एकमत आहे. कोरोना अगोदरही शाळेत जाण्यासाठी मुलांची टाळाटाळ सुरु होती. शाळा टाळण्यासाठी मानसिक आजार होत असलेली मुले आम्ही आठवड्यांतून एकदा पहायचो. आता दरदिवसाला किमान एक ते पाच केसेस आम्हाला शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करणा-या मुलांच्या दिसून येतात. या मुलांचा शैक्षणिक पाया कच्चा असल्याने शाळेत शिक्षक शिकवताना त्यांची एकाग्रता दिसून येत नाही. सतत स्क्रीनमुळे मुलांना हातात पेन-पेन्सिल धरता येत नाही, मुलांचे हस्ताक्षर बिघडले. या सर्वांत भयावह गोष्ट म्हणजे मुलांमध्ये अंतर्मूख, चारचौघांतील संभाषण टाळण्याचा स्वभाव जास्त तयार होत असल्याची भीती बालरोगतज्ज्ञ आणि पल्मोनोलॉजिस्ट आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिशियनच्या मुंबई शाखेच्या सदस्या डॉ. इंदू खोसला यांनी दिली. परिणामी, मुलांनी आत्मविश्वास गमावल्याचा फटका त्यांना बाहेरच्या वातावरणात बोलताना शब्दच सूचत नसल्याचेही डॉ. खोसला म्हणाल्या.

देशभरात ही समस्या आढळून येतेय…

मुलांना घर किंवा पालकांना सोडून शाळेत जावेसे वाटत नाही. मुलांमध्ये शाळेत जाण्याबाबत मनात तयार झालेली नकारघंटा मानसिक आहे. ही लक्षणे केवळ बालरोगतज्ज्ञच ओळखू शकतात. त्यामुळे थेट समुपदेशकांकडे जाऊ नका. मुलांना नॉर्मल आयुष्यात समरस होण्यासाठी पालक, शिक्षक, बालरोगतज्ज्ञ या सर्वांनीच काम करायला हवे. अभावानेच काही केसेस समुपदेशकांकडे जातात.
डॉ . केतन शाह, बालरोगतज्ज्ञ, सदस्य, गुजरात शाळा, इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिशियन

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.