प्रायमरी आणि प्री प्रायमरीतील मुलांना कोरोनापूर्वीच शाळेचा परिचय झाला होता. काही तासांसाठी शाळेत जायचे असते, अशी मुलांची मानसिकता होती, त्यानंतर लॉकडाऊन झाले. लॉकडाऊनमुळे शिक्षण थांबू नये म्हणून त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा परिचय करून देण्यात आला. या वयोगटाच्या मुलांनी सलग दोन वर्षे लॉकडाऊनचा काळ अनुभवला. त्यानंतर हळूहळू जनजीवन सुरळीत होत असताना शाळाही सुरु झाल्या.
पुन्हा शाळा सुरु होत असल्याने बराच काळ पालकांच्या सहवासात राहिलेल्या मुलांना शाळा नकोशी वाटू लागली. ही मुले आता पाच वर्षांची झाली आहेत. शिवाय या मुलांना ऑनलाइन शिक्षणामुळे तसेच लॉकडाऊन काळात घरातच बराच काळ रहावे लागल्यामुळे त्यांना समाजात वावरताना त्रास होऊ लागल्याचे दिसते. हा शारीरिक त्रास नव्हे, तर मानसिक त्रास आहे.
मुले कम्फर्ट झोन सोडायला तयार नाहीत
मुलांना योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही, शाळेत जबरदस्तीने पाठवल्याने मुले पालकांवर आरडाओरड करतात, प्रसंगी हातही उगारतात. शालेय जीवनात शिक्षक प्रत्यक्षात समोर हजर राहून शिकवतात, त्यासाठी त्यांना घराबाहेर जावे लागते, ही कल्पना त्यांना नकोशी वाटत आहे. मुले पालकांच्या सहवासातील कम्फर्ट झोन सोडायला तयार नाहीत. या मुलांपासून अगदी किशोरवयीन गटातील मुले ऑनलाइन जीवनशैलीच्या आहारी गेली आहेत.
ऑनलाइन शिक्षण त्यांना लॉकडाऊन काळातही मनापासून रुचले नाही. दोन-तीन तास लॅपटॉपवर सतत राहिल्याने पाच वर्षांपासूनच मुलांना आता डोळ्यांच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. चष्मे लागण्याचे प्रमाणही वाढले. पालकांनी शाळेत मुलांना पाठवण्याची लगबग सुरु केली की, मुलांना उलटी होते, पोटदुखी किंवा डोकेदुखी सुरु हेते. शाळेचा विषय बदलताच शारीरिक दुखणी निघून जातात.
मोबाइल, लॅपटॉपचा वापर शिक्षणबाह्य माहिती मिळवण्यासाठी
एकदा शाळेत गेलेले मूल अचानक आजारी पडल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचा इमर्जन्सी फोन आला. मुलाच्या पोटात दुखू लागल्याचे शाळेतल्या मुख्याध्यापकांनी मुलाच्या आईला कळवले. भेदरलेल्या आईने तातडीने रुग्णालय गाठले. आईला पाहताच मुलाची घाबरगुंडी, पोटदुखी सर्व काही गायब झाले. एव्हाना मीही रुग्णालयात पोहोचलो होतो. मूल नॉर्मल असल्याचे दिसताच मला नेमका काय प्रकार झाला आहे, हे लक्षात आले. हा विषय ऑनलाइन शिक्षणाचा नाही.
लॉकडाऊन काळात पाच वर्षांपुढील मुलांच्या स्वभावात मोबाइलच्या वापराने बदल झाले आहेत, त्यावर संयमाने सकारात्मक बदल घडवण्याची गरज आहे. मुलांनी मोबाइल, लॅपटॉपचा वापर शिक्षणापेक्षा इतर गोष्टींची माहिती घेण्यासाठी केला. व्हिडिओ गेम खेळण्यासाठी तासनतास मोबाइल किंवा लॅपटॉवर वेळ घालणवारी मुले पटकन आक्रमक होत आहेत. मुले पालकांना चांगली वागणूक देत नसल्याच्याही तक्रारी करणारा मोठा पालकवर्ग आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलामध्ये अकाली प्रौढत्व
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमध्ये अकाली प्रौढत्व येत आहे. आता नऊ वर्षांच्या मुलांमध्ये वयात येण्याची लक्षणे पटकन दिसून येत आहेत. मुलींच्या मासिक पाळीचे वय आता नऊ वर्षांवर आले आहे. पूर्वीदेखील मुली ठराविक वयाआधीच वयात यायच्या परंतु आता सर्रास मुली नऊ ते दहा वर्षांच्या झाल्या की, त्यांची मासिक पाळी सुरु होत आहे. या वयात मुलींकडून लैंगिक शिक्षण समजून घेण्यासाठी सोशल प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.
पालकांनी मुले नऊ वर्षांची झाली की, त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मकडे लक्ष द्यावे, तसेच त्यांच्याशी मित्रत्वाने बोलावे. कित्येकदा कुटुंबीय टीव्हीवर एकत्र सिनेमा पाहत असताना काही प्रौढांची दृश्ये सुरु होतात. अशावेळी पालक पटकन दूरचित्रवाहिनी बदलतात. परंतु मुलांच्या मनात निर्माण झालेली उत्सुकता कित्येकदा सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांना पुन्हा आकर्षित करते. आता नऊ ते दहा वर्षांची मुले प्रौढांसाठी असलेली संकेतस्थळेही पाहतात.
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या स्वभावातील बोलकेपणा आता कमी होऊ लागला आहे. समाजात वावरताना ते फार काळ अंतर्मुख राहणेच पसंत करतात. त्यांच्यामध्ये संवेदनशील स्वभाव निर्माण होण्यास बराच वेळ लागेल. शिवाय त्यांना शालेय जीवनातील अभ्यासक्रमातही असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ऑनलाइन शिक्षणकाळात विषयानुरुप प्रत्येक संकल्पनेचा त्यांचा पाया तयार झाला नाही. परिणामी त्यांना पुढच्या इयत्तेतील अभ्यास समजत नाही. पालकांनी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मानसिक ताण आणू नये. मुलांना त्यांच्या कलेने समजून घेणे आवश्यक आहे.
(लेखक न्यूऑन क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ असून इंडियन अकॅडेमी ऑफ पिडिएट्रीशिअन, मुंबई शाखेचे सदस्य आहेत).
Join Our WhatsApp Community