कोरोनामुळे माणसाच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. या काळात घराबाहेर पडणेच दुरापास्त झाल्याने लहान मुलांना शिक्षणासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरच अवलंबून राहावे लागले. तब्बल दोन वर्षांनंतर मुले पूर्ण वेळ शाळेत जाऊ लागली आहेत. शाळेच्या सहा तासांची सवय सुटलेल्या मुलांना आता शिक्षणात रमायला वेळ लागत आहे. मुलांना शाळेत पाठवताना पालकांनाही काही आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.
मुलांच्या स्वभावात नकारात्मक बदल
मागील दोन वर्षांत ऑनलाइन शिक्षणपद्धती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या संगणक, लॅपटॉप आणि मोबाइलच्या वापरामुळे आता स्क्रीनटाईमबाबत बोलले जात आहे. प्रौढांमधील वाढते स्क्रीनटाईमचे व्यसन आता लहान मुलांमध्येही दिसून येत आहे. शिक्षणासाठी मोबाइल मिळाला असला तरीही प्रत्यक्षात मोबाइल हातात आल्यानंतर मुले भलत्याच गोष्टींसाठी त्याचा वापर करत आहेत. दोन वर्षांनी शालेय शिक्षण सुरु झाल्यानंतर मुलांमध्ये एकाग्रता कमी झाल्याचे शिक्षकांचे निरीक्षण आहे. मुलांमधील स्वभावात झालेल्या बदलांचा विचार केल्यास ऑनलाइन शिक्षणपद्धतीने मुलांच्या स्वभावात नकारात्मकता लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे.
माहितीच्या संकलनासाठी युट्यूबचा कमी वापर
सध्या मुलांना वर्गात एकाग्रतेने शिकता येत नसल्याबाबत शिक्षकांमध्ये एकमत आहे. या पिढीला स्मार्ट म्हणता येईल, कारण तांत्रिक शिक्षणात ही मुले खूप लहान वयात सक्षम झाली आहेत. मेल करणे, पीडीएफ फाईल बनवणे, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवणे आदी कामांत ही मुले कुशल आहेत. गुगल, युट्युब आदी माध्यमांचा वापर करुन शिक्षण नक्कीच घेता येते.
परंतु शिक्षणासाठी गुगल आणि युट्यूब वापरण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मुले मोठ्या प्रमाणात युट्यूब वापरतात. यु ट्युबच्या माध्यमातून मनोरंजन नक्कीच होते. मात्र मुले माहितीच्या संकलनासाठी युट्यूब फारच कमी वापरतात. मोबाइलमधून यु ट्यूब पाहण्याचे प्रमाण जास्त आहे. मोबाइलच्या व्यसनाने शाळेत प्रत्यक्षात शिक्षकांसमोर अध्ययन करताना मुलांमध्ये सतत चिडचिडेपणा येत आहे. मात्र या नकारात्मक बदलांमागील मूळ कारण मोबाइलवर मुले कोणती माहिती पाहतात, यात आहे. केवळ चिडचिडेपणाच नव्हे, तर लहान वयात प्रौढांचे विषय इंटरनेटच्या मायाजालात लहान मुलांना परिचित होत आहेत. पालकांनीच युट्यूबवर एखादी ब्लू फिल्म पाहिली असेल तर ती ही माहिती युट्यूबच्या डेटामधून मुलेही पाहतात. लहान वयातच शारीरिक संबंध, नैसर्गिकरित्या मूल होण्याचे कारण खूप लहान वयात मुलांना समजू लागले आहे.
या पिढीला खूप लहान वयात प्रौढांचे विषय समजू लागले आहेत. मुलांच्या मानसिकतेसाठी हे निश्चितच चांगले नाही.
ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असावी. शाळेत एखादा विषय शिकवल्यानंतर संबंधित विषयाबाबत असलेली माहिती अधिक सक्षमपणे जाणून घ्यायची असेल तर मुलांनी घरी परतल्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा आधार घ्यावा. त्या विषयासाठी मुले गुगल सर्च किंवा युट्युबवर माहिती शोधत असतील तर ऑनलाइन शिक्षणाची नांदी चांगली होईल. मुलांमध्ये शालेय जीवनात प्रत्यक्षात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा संवाद घडतो. चर्चेतून मुलांमध्ये उत्सुकता निर्माण होते. त्यातून एखाद्या विषयाबाबत अधिक जिज्ञासा निर्माण होत असेल तर ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा आधार घेत मुलांच्या कल्पकतेला वाव मिळेल.
(लेखक शिक्षणतज्ज्ञ आहेत.)
Join Our WhatsApp Community