कोरोना काळानंतर मुलांमध्ये दिसून येत आहेत ‘हे’ शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम- डॉ. इंदू खोसला

लहान मुलांना इंटरनेटचे व्यसन लागले आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ऑनलाइन शिक्षणाने वाढत्या स्क्रीनटाईममुळे मुलांमध्ये दिसून येणारा बदल हा निश्चितच त्यांच्या बौद्धिक वाढीला खुंटवणारा आहे. अगदी रांगणारे मूलदेखील एका ठिकाणी स्थिर राहू द्यावे म्हणून जेवणापुरते का होईना पालक त्याच्या हातात मोबाइल देतात. आता मोबाइलची सवय अगदी लहान वयातच लागल्याने त्याचे दुष्परिणाम म्हणून घरातच किंवा शेजारच्या, नातलगांच्या घरातील लहान मुलांच्या स्वभावात रागीटपणा वाढलेला दिसेल.

वाढता स्क्रीनटाईम

सर्वात अगोदर स्क्रीनटाईमची संकल्पना समजून घ्या. सतत मोबाइल किंवा डिजीटल माध्यमावर तुमची मुले या आधी किती वेळ घालवतात, याकडे लक्ष द्या. द अमेरिकन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिक्सने दोन वर्षांखालील मुलांना डिजीटल माध्यमांच्या वापरावर बंदी घातली आहे. मोठ्या वयातील मुलांनी केवळ एक किंवा दोन तास डिजीटल माध्यमे वापरण्याचा सल्ला अकॅडेमी देते.

मुलांमधील कोणते शारीरिक आणि मानसिक बदल होतात?

स्थूलता – तुमचे मूल जास्त स्क्रीनटाईमच्या आहारी गेले असल्यास वयापेक्षाही त्याचे वजन वाढत जाते, हा पहिला बदल दिसतो. माझ्याकडे दहा वर्षांच्या मुलाचे १०३ किलो वजन असल्याची केस आहे. या मुलांना समजावणेही आव्हानच आहे. मुलांना पचनप्रक्रियेचाही त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

झोपेची सवय बिघडते – बेडवर बसून किंवा सतत झोपतच राहिल्याने मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. मुले जंक फूडच्या आहारी गेल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहत आहोत. सतत स्क्रीनकडे पाहणारी मुले झोपेच्या बाबतीत काचकूच करतात. अवेळी झोप घेणे हा प्रकार वाढू लागला आहे.

रोगप्रतिकारकशक्ती बिघडते – चुकीच्या जीवनशैलीच्या आहारी गेलेल्या मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्याचे दिसून येत आहे. झोप पुरेशी नसल्याने त्यांच्यातील कार्यमग्नता शिथील होऊन जाते. या सर्व बदलांवर काम करण्यासाठी पालकांनी मुळात मुलांच्या बदलत्या स्वभावाला समजून घ्यावे. त्यासाठी पालक, शिक्षक, डॉक्टर्स या सर्वांची भूमिका महत्त्वाची ठरते. कित्येकदा आपला मुलगा अभ्यासात अपेक्षित गुण आणत नसल्याच्या पालकांच्या तक्रारी असतात.

प्रसंगी फटके मारत ‘अभ्यास कर रे’, असा पालकांचा अट्टाहास असतो. दोन वर्षे ज्या मुलांनी केवळ ऑनलाइन शिक्षणाची बाराखडी गिरवली आहे, अशा मुलांचे सामजिक अंतरंग खूप वेगळे आहे. त्याविषयी सजगता बाळगत पालकांनी मुलांच्या कलेने त्यांना एखादी गोष्ट शिकवणे आवश्यक आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांना शाळा आता नकोशी झालेली आहे. अशा तक्रारी रोज आम्ही पाहतो.

पालकांनी काय करावे?

  • मुलांना पुन्हा बाहेरील जगात मिसळता येण्यासाठी खुद्द पालकांनी पुढाकार घ्यावा.
  • आता जग पुन्हा नॉर्मल होऊ लागले आहे. एखादा घरगुती कार्यक्रम म्हणा किंवा दर आठवड्याला ओळखीच्या माणसांशी भेट घालून द्यावी, ही माझी पालकांना आवर्जून विनंती आहे. त्यांच्या स्वभावातील तक्रारीचा पाढा हळूहळू कमी होत असल्याचे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल.
  • मैदानी खेळांचा मुलांशी पुन्हा संबंध घालून द्या किंवा बिल्डिंगमधील मुलांना घरी बोलावून एखादे छोटेखानी गेट टू गेदर करा.

(लेखक बालरोगतज्ज्ञ, पल्मोनोलॉजिस्ट व इंडियन अकॅडेमी ऑफ पीडियाट्रिशियनचे सदस्य आहेत.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here