शालेय वयोगटातील मुलांमध्ये शारीरिक बदल झपाट्याने होत आहेत. दोन वर्षे घरातच राहिल्याने मुला-मुलींमध्ये स्थूलतेचा आजार प्रामुख्याने आढळून आला. शाळा सुरु होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरीही मुलांना शाळेत रमायला अद्याप जमत नाही, हे खरे आहे. कोरोना काळाची विदारक स्थिती समजलेल्या तेरा वर्ष वयोगटातील मुले केवळ शाळेत जायला उत्सुक आहेत.
दोन वर्षे शाळेतील वर्ग अनुभवला नाही. वर्गातील सर्व मित्र आणि मैत्रिणी भेटले नाहीत. शाळेत केवळ मित्र मैत्रिणींना भेटायला जायचे, अशी विचारधारा इयत्ता आठवी ते दहावी वयोगटातील विद्यार्थ्यांची बनली आहे. वर्गात अध्ययनामध्ये मुलांना अजिबात रुची उरलेली नाही. ही मुले दिवसभर गप्पाटप्पांमध्ये रमलेली असतात.
मुलांनी आत्मविश्वास गमावला
अक्षरांची मूळ ओळख होण्याच्या वयातच मुलांच्या हातात पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी लॅपटॉप आणि मोबाइल दिला. अक्षरांची आणि शब्दांची ओळख नसलेली मुले इंटरनेटच्या जाळ्यात दोन वर्षे राहिली. या मुलांना आता वाचनही कठीण झाले आहे. शब्दांची ओळख तर दूरच… मुलांचा पाया कच्चा राहिल्याचे सर्व शिक्षकांमध्ये एकमत झाले आहे. शाळेत परतल्यानंतर अभ्यासाचा पाया कच्चा असलेल्या मुलांनी आत्मविश्वास गमावला आहे. काहींना गणित, विज्ञान या कठीण विषयांची भीती वाटू लागली आहे, हे विषय आपल्याला जमणार नाही, असा न्यूनगंड बनला आहे. सरासरी काढल्यास एका वर्गातील ४० मुलांपैकी केवळ दोन मुलांना कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षणाचा कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही.
मुलांना शिकवणे शिक्षकांसमोर आव्हान
वर्गात मन रमत नसल्याने मुले थातुरमातुर कारणे देऊ लागली आहेत. दुपार व्हायच्या अगोदरच मुलांना दोन-तीन वेळा शौचास जावे लागते. शाळा सुरु असतानाच मधूनच शाळेतून पळून जाण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता बनली आहे. कित्येकदा मुलांचे अधूनमधून पोट दुखू लागते, डोकेही दुखते. मुलांच्या कलेने घेऊन त्यांना शिकवणे शिक्षकांसमोर मोठे आव्हान आहे. कित्येकदा मुले शाळेत न येण्यासाठी खोटी कारणे शोधतात. आता नियम किंवा शिस्तीवर बोट ठेवून मुलांना ओरडणे योग्य नाही. त्यांच्या स्वभावातील आंतरिक बदल ओळखणे गरजेचे आहे. सुट्टीवर असलेल्या मुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसवरुन ते नेमके काय करत आहेत, हे समजते. आज प्रत्येक शिक्षक ५० टक्के समुपदेशक बनला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील भावना ओळखून त्यांना अभ्यासाकडे वळवण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहिले आहे.
मुलांना घराबाहेर रमायला वेळ लागतोय
शाळेतील वातावरणात विद्यार्थी समरस कसे होतील, याकडेही शिक्षकांचे लक्ष लागले आहे. ही मुले आपल्या भावना व्यक्त करु शकत नाहीत. या पिढीला मुळात अंतर्मूख होण्याची भीती आहे. केवळ ऑनलाइन शिक्षणात बराच काळ व्यतीत केल्याने त्यांना घराबाहेर रमायला वेळ लागतो आहे. ही समस्या यंदा दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी गंभीर बनली आहे. दोन वर्षांच्या काळात दहावीच्या मूळ अभ्यासाचा पाया ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून रचला गेला. आता थेट दहावी आल्याने मुलांना अभ्यासक्रम कितपत समजतो, हे जाणून घेणे प्रत्येक शिक्षकासाठी गरजेचे आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांमध्ये नकारात्मक स्वरुपाचे बदल झाले आहेत. ही समस्या केवळ अभ्यासापुरती नसून, वेगवेगळ्या पातळ्यांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. ऑनलाइन शिक्षण प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या परवडेलच असे नाही. अशा वेगवेगळ्या कारणांमुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूरावले गेले, प्रत्येकाची कारणे वेगवेगळी आहेत. त्याचा मागोवा घेऊन आगामी तरुण पिढी सक्षम करायचे आव्हान शिक्षकांसमोर आहे.
(लेखक कुर्ला येथील एका शाळेतील शिक्षक आहेत.)
Join Our WhatsApp Community