आपली भारतीय गुरुशिष्य परंपरा खूप मोठी आणि समृद्ध आहे. या परंपरेचे औचित्य साधून व्यास क्रिएशन्स् तर्फे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त व्यासोत्सव २०२३ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन ठाण्यातील सहयोग मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वाचक, लेखक रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.विजय जोशी आणि कवयित्री, चित्रकार ललित लेखिका डॉ. मीनाक्षी पाटील (सचिव, साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य) आणि कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण हे लाभले होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संगीतकार गायक विनय राजवाडे, आरती गाडगीळ, श्रद्धा पिंपळे आणि सहकारी यांच्या ’सुर आनंदघन’ या सुश्राव्य हिंदी मराठी गीतांच्या सांगीतिक मैफिलीने झाली. या कार्यक्रमात ‘आज कुणीतरी यावे’, ‘घन घन माला’, ‘ये राते ये मौसम’, ‘श्रावणात घननिळा बरसला’ अशी पावसाची विविध रूपे असलेल्या सुंदर गीतांचा आस्वाद रसिकांनी घेतला.
दीपप्रज्वलन व नृत्य वंदनेनंतर व्यास क्रिएशन्स्चे संचालक निलेश गायकवाड आणि राज्ञी वेल्फेअर असो. च्या संचालिका वैशाली गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यास क्रिएशन्स्चा प्रवास व हा सोहळा करण्यामागची आपली भूमिका मांडली. त्यानंतर व्यास क्रिएशन्स्च्या प्रतिभा, प्रतिभा स्पेशल, पासबुक आनंदाचे व आरोग्यम या चार दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात बालसाहित्यिक व कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांना नुकताच ’छंद देई आनंद’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने आव्हाड यांचा व्यास क्रिएशन्स्कडून जाहीर सत्कार करण्यात आला.’ लहान मुलांशी संवाद साधत असताना मला वेगवेगळे विषय समजत गेले, विचारांना चालना मिळाली त्यामुळे मुलांनीच मला लिहिते ठेवले’ हे मनोगत त्यांनी मांडले. त्याच दरम्यान कवयित्री नीलम मोरे शेलटे यांच्या ‘जगले ते लिहिले’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या डॉ. प्रदीप ढवळ, डॉ. महादेव जगताप, प्रीतम देऊसकर, डॉ. वैशाली दाबके आणि डॉ. सीए वरदराज बापट या पाच प्रज्ञावंताना मान्यवरांच्या हस्ते ’व्यासरत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी डॉ. वैशाली दाबके यांनी पुरस्कार्थींच्या वतीनं मनोगतातून सर्वांचे आभार मानले. ‘समाजात वाचन संस्कृतीचे महत्त्व लहान मुलांना समजावे या हेतूने बालसाहित्यविषयक पुस्तके निर्माण केली पाहिजेत, तसेच काळाची गती प्रचंड वेगाने झपाटत चालली आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळाप्रमाणे गुरु शिष्य परंपरा राहिली नाही आता शिष्य गुरूला निवडत आहे’ अशी भावना रंगकर्मी डॉ. विजय जोशी यांनी व्यक्त केली. तर ’काळाच्या गतीप्रमाणे प्रत्येकाचे विचार, स्वप्न वेगवेगळी आहे. कोणाला कोणत्या प्रकारे यश मिळेल हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते.’ असे मत डॉ. मीनाक्षी पाटील यांनी व्यक्त केले.
(हेही वाचा – विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये सुरु)
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ खगोलतज्ञ दा. कृ. सोमण यांनी आपले विचार प्रकट केले. ते म्हणाले ‘सध्या अधिकमास सुरू झालेला आहे. व्यास क्रिएशन्स्चा हा १८ वा वर्धापनदिन. या वर्षात व्यास क्रिएशन्स् यांनी अधिक संधी निर्माण कराव्यात, अधिक पुस्तकं, अधिक कार्यक्रम आयोजित करावेत. त्यांना निश्चितच यश लाभेल. दुसर्याला अत्तर लावताना नकळत आपला हातही सुगंधित होतो त्याप्रमाणे व्यासरत्न पुरस्कार प्रदान करताना मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत आहे.’ या संपूर्ण सोहळ्याचे नेटके आणि सहजसुंदर निवेदन धनश्री प्रधान दामले यांनी केले तर व्यास क्रिएशन्स्चे व्यवस्थापक दीपक देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम उत्तरोत्तर बहरत गेला. रसिक श्रोत्यांच्या टाळ्यांच्या गजरात व्यासोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community