- संतोष वाघ
हेरगिरीच्या संशयावरून पिरपाव जेट्टी येथून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले चिनी कबूतर ८ महिन्यांपासून बैलघोडा रुग्णालयात एका पिंजऱ्यात बंद आहे. हे चिनी कबूतर सुटकेच्या प्रतीक्षेत असले, तरी पोलिसांकडून अद्याप त्याच्या सुटकेसाठी कुठलाही अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही. या परदेशी पाहुण्याची परळच्या बैलघोडा रुग्णालयात डॉक्टरांकडून योग्यरित्या काळजी घेतली जात असून ठणठणीत असलेल्या या कबूतराला इतर पक्षांचा आजार जडू नये याची चिंता येथील डॉक्टरांना वाटत आहे.
पूर्व उपनरातील चेंबूरच्या आरसीएफ पोलिसांच्या हद्दीत असणारी पिरपाव जेट्टी येथील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औधोगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ताब्यात आहेत. १७ मे २०२३ रोजी एक कबूतर जखमी अवस्थेत येथील सीआयएसएफच्या जवानाला आढळून आले, हे कबूतर तैवान देशातून आलेल्या जहाजावरुन आल्याच्या संशयावरून तसेच या कबूतरांच्या एका पायात तांब्याची रिंग आणि एका पायात एक चिप बसविण्यात आली होती, त्याच बरोबर कबूतराच्या पंखांच्या दोन्ही बाजूंनी लाल आणि हिरव्या रंगात चिनी भाषेत काही तरी संदेश लिहिलेला आढळून आल्यामुळे हे कबूतर चीन देशातून हेरगिरी करण्याच्या उद्देशातून पाठविण्यात आल्याच्या संशय आरसीएफ जवानांना आल्यामुळे त्यांनी तात्काळ आरसीएफ पोलिसांना याबाबत सूचना दिली होती.
आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चिनी कबूतर ताब्यात घेऊन त्याच्या पायाला लावलेली रिंग आणि दुसऱ्या पायाला असलेली चिप काढून कबूतराच्या पंखाचे छायाचित्र काढून तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले व कबूतराला उपचारासाठी परळच्या बैलघोडा रुग्णालयात पाठविण्यात आले. पूर्व उपनगरातील चेंबूर, गोवंडी ,ट्रॉम्बे या परिसरात अति संवेदशील केंद्र असल्यामुळे भाभा अणुशक्ती केंद्र, भारत पेट्रोलियमचा मोठा प्लांट, राष्ट्रीय फर्टिलायझर यासारखे अतिसंवेदशील भाग असल्यामुळे पोलिसांकडून संशयास्पदरित्या आढळून आलेल्या चिनी कबुतराच्या पंखावर असलेला संदेश आणि पायात असलेल्या चिपवरून तपास सुरू करण्यात आला होता.
आठ महिन्यांनी …
परळच्या बैलघोडा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले चिनी कबूतराला आठ महिने होऊन गेले आहेत. या कबुतराच्या पंखावरील लिहिण्यात आलेले पुसले गेले आहे. हे कबूतर प्रकृतीने ठणठणीत झाले आहे. या कबूतराला एका पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आलेले आहे. या कबूतराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे प्रतिनिधीनी बैलघोडा रुग्णालयाला भेट देऊन येथील रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉक्टर मयूर डांगर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले कि, हे कबूतर १८ मे २०२३ रोजी चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांनी आम्हाला दिले होते. कबूतराच्या पायात दोन अंगठ्या होत्या, एक तांब्याची आणि दुसरी अॅल्युमिनियमची, कबूतराच्या पंखावर “चिनी किंवा तत्सम भाषेतील संदेश लिहलेला होता असे डॉ. डांगर यांनी सांगितले. हे कबूतर आरसीएफ पोलिसांकडून आमच्या ताब्यात देण्यात आले आहे, हे रुग्णालय प्राण्यासाठी शहरातील एकमेव रुग्णालय असल्यामुळे आम्ही त्या कबूतराला दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले होते. आता हे कबूतर ठणठणीत झाले आहे, त्याला इतर आजारी पक्षाचा संसर्ग होऊ नये म्हणून चिंता वाटत आहे. पोलीस आम्हाला अधिकृत पत्र पाठवून या कबुतराला सोडण्याचा आदेश देतील त्या वेळी आम्ही हे कबूतराला पिंजऱ्यातून आणि आमच्या कस्टडीतून मुक्त करू, असे डॉ. डांगर यांनी ‘हिंदूस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
पोलिसांचे म्हणणे काय?
आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, कबूतर अजूनही रुग्णालयाच्या ताब्यात असल्याबद्दल त्यांनी प्रथम आश्चर्य व्यक्त केले. रुग्णालयाकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झाले होते, म्हणून आम्ही असे गृहित धरून चाललो की, त्यांनी त्याला सोडले असेल असे पाटील म्हणाले. पाटील पुढे सांगितले की, या कबूतराबाबतचा आमचा संशय केव्हाच दूर झाला आहे, हे कबूतर हेरगिरी करण्यासाठी आलेले नव्हते हे फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून समोर आले आहे. हे कबुतर शर्यतीतमधील कबूतर असून तैवानमध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांची शर्यती लावण्यात येतात, त्यांच्या पायात चिप बसवलेली असते त्यात कबुतराच्या शर्यतीच्या पायात सापडली चिप मध्ये तो किती दूरपर्यत गेले याची माहिती या चिपमध्ये असते. हे कबूतर एक रेसिंग कबूतर आहे आणि ते चुकून तैवानच्या जहाजाने शहरात आले होते. जेथे या कबूतरांची समुद्रात शर्यतीसाठी वापरले जाते, असे तपासात समोर आले असल्याची माहिती सपोनि. पाटील यांनी दिली आहे. लवकरच वरिष्ठांची परवानगी घेऊन या कबूतराला मुक्त करण्यासाठी रुग्नालयासोबत पत्रव्यवहार केलं जाईल, असे पाटील यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना सांगितले.
हेही पहा –