भारत, अमेरिकेच्या विरोधाला न जुमानता युआन वांग ५ हे चीनचे हेरगिरी करणारे जहाज आज, मंगळवारी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले असल्याचे वृत्त आहे. १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान या जहाजाला हंबनटोटा बंदरात मुक्काम करण्यासाठी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच परवानगी दिली होती. श्रीलंकेच्या दक्षिण भागातील हंबनटोटा बंदर तब्बल दीड अब्ज डॉलर खर्चून तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे बंदर आशिया आणि युरोप समुद्री मार्गावरील प्रमुख बंदर असून सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागी आहे.
Chinese research vessel Yuan Wang 5 reached the Hambantota Port this morning, reports Sri Lanka's Daily Mirror
(Photo credit: Daily Mirror) pic.twitter.com/Wxt2AHHeZi
— ANI (@ANI) August 16, 2022
चीनचा वाढता संचार भारतासाठी डोकेदुखी
युआन वांग ५ हे एक संशोधन करणारे जहाज आहे. त्याला सुरक्षा विश्लेषकांनी गुप्तहेर जहाज म्हटले आहे. या जहाजातील उच्च तंत्रज्ञानामुळे उपग्रह, आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा माग काढणे (ट्रॅकिंग) सहज शक्य आहे. त्यामुळे भारताला चीनकडून हेरगिरीचा धोका निर्माण झाला आहे. चीनकडून हंबनटोटा बंदराचा वापर लष्करी कार्यवाहीसाठी होऊ शकतो, अशी भारताला शंका आहे. हिंद महासागरात चीनचा वाढता संचार भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. याबरोबरीने चीन ज्या पद्धतीने श्रीलंकेवर अंकुश बनवू पाहत आहे ते भारतासाठी चिंताजनक आहे. श्रीलंकेचा हा भाग तामिळनाडूपासून केवळ ५० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच कन्याकुमारी आणि हंबनटोटा बंदरादरम्यान फक्त ४५१ किमी अंतर आहे. हे अंतर विमानाने केवळ अर्ध्या तासात कापता येऊ शकते. तसेच अमेरिकेनेही चीनच्या जहाजाच्या पाळत ठेवण्याच्या क्षमतेमुळे चिंता व्यक्त केली होती.
कोणतेही संशोधन न करण्याच्या अटीवर जहाजाला बंदरात प्रवेश
श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, सर्व गोष्टींचा विचार करून चीनच्या जहाजाला १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान मुक्कामी येण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. युआन वांग-५ हे उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे. भारताने याला विरोध दर्शवल्यानंतर श्रीलंकेने याआधी चीनला जहाजाचा प्रवेश लांबणीवर टाकण्यास सांगितले होते. पण यानंतर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया आली होती. भारत, अमेरिका आणि चीन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या पाण्यात असताना ते कोणतेही संशोधन करणार नाहीत, या अटीवर जहाजाला बंदरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, भारताने चीनच्या धमक्या आणि इशाऱ्यांना न जुमानता देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेऊ असे सुनावले होते.
चीनने या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, श्रीलंकेवर दबाव आणण्यासाठी काही देश सुरक्षेबाबत चिंतेचे कारण पुढे करत आहेत. त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. त्यानंतर श्रीलंकेने १३ ऑगस्ट रोजी या जहाजाला बंदरात प्रवेश देण्यास परवानगी दिली.
श्रीलंकेचा नाईलाज
चीनने श्रीलंकेतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे श्रीलंका चीनच्या कर्जाने ओझ्याने आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच हंबनटोटा बंदराच्या उभारणीसाठी घेतलेले कर्ज चुकवता न आल्याने श्रीलंकेने चीनकडे हे बंदर ९९ वर्षांसाठी गहाण ठेवले आहे. एकूणच नाईलाजाने श्रीलंकेला या जहाजाला आपल्या बंदरात थांबण्याची परवानगी द्यावी लागली.
Join Our WhatsApp Community