गेल्या दीड ते दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून संपूर्ण जीवनशैली विस्कळीत झाली आहे. कोरोना नियमांचे पालन करत असणाऱ्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याचे संकेत आहे. कारण कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने केंद्राच्या सूचनेनुसार, राज्यातील निर्बंध लवकरच शिथिल करण्यात येणार आहेत. त्यानुसार, हॉटेल्स, सिनेमागृह आणि थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
एक-दोन दिवसांत नियमावली जारी
कोरोना बाधितांचा आकडा घसरल्याने निर्बंध शिथिल करण्याची सूचना केंद्र सरकारने बुधवारी राज्यांना केली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सचिव पातळीवर कोरोनास्थितीचा आढावा घेण्यात आला. कोणते निर्बंध शिथिल करता येतील, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी होणाऱ्या राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर एक-दोन दिवसांत नियमावली जारी केली जाणार आहे.
या जिल्ह्यातच या सवलती मिळणार
सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, सफारी, पर्यटन स्थळे, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, नाट्यगृह, हॉटेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केले आहेत. तसेच लग्नसमारंभासाठी २०० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवरील निर्बंध रद्द करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही राज्यात ब्युटी सलून तसेच केशकर्तनालय, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, वॉटर पार्क, उपाहारगृहे, नाटय़गृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याचे बंधन आहे. त्याचप्रमाणे लसीकरणाची पहिली मात्रा ९० टक्क्यांपेक्षा अधिक आणि दुसरी मात्रा ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी घेतलेल्या जिल्ह्यातच या सवलती देण्यात आल्या होत्या.
(हेही वाचा – शिवसेनेच्या मूकसंमतीने अखेर मालेगावातील उर्दू घराला दिले ‘हिजाब गर्ल’चे नाव!)
समोर आलेल्या माहितीनुसार, मागील २० दिवसांत कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने कमी होत असून सध्या दोन ते अडीच हजार लोक बाधित होत आहेत. त्यातही रूग्णालयात दाखल होणाऱ्या बाधितांची संख्या कमी होत असल्याने हॉटेल्स, थिएटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासह लग्न व अन्य समारंभांच्या उपस्थितीवर मर्यादा वाढविण्यात येणार आहे.