वाघाटी मृत्यूप्रकरणात क्लीन चिट…. बछड्याच्या मृत्यूचे काय?

134
बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन प्राण्यांच्या मृत्यूनंतर प्राण्यांच्या नियमित देखभालीसंदर्भात अद्यापही कमालीचा निष्काळजीपणा सुरु आहे. उद्यानात अजूनही नियमित निवासी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. जून महिन्यात वाघाटीच्या मृत्यूला अपघाती मृत्यूचे नाव देत आता उद्यानातच  तब्येत ढासळलेल्या तीन बछड्यांपैकी एकाच्या मृत्यूचे खापर कोणावर फोडायचे, या विचारात वनाधिकारी आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून उद्यानात पूर्णवेळ कायमस्वरूपी आणि निवासी डॉक्टर नाही. दोन प्राण्यांच्या देखभालीसाठी साठीपार पशुवैद्यकीय अधिकारी घेणे जिकरीचे ठरेल, याची जाणीव आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला आली आहे. पशुसंवर्धन विभागातील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी या अटीसह वनविभागाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला केवळ एकच अर्ज आला. आता वयाची अट बाजूला सारत लवकरच तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संधी दिली जाईल, असे संकेत उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी मल्लिकार्जुन यांनी दिले. वाघाटीच्या मृत्यूप्रकरणात प्राणीरक्षकांची चूक होती का, याची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होती, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र वाघाटीच्या उपचारातील घटनाक्रमात त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. वाघाटीच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात उत्तरे विचारली असता रजेवर गेलेल्या जी मल्लिकार्जुन यांनी प्रतिसाद दिला नाही.
ड जीवनसत्त्व तसेच कॅल्शियमच्या कमतरतेने बिबट्याच्या तीन बछड्यांची प्रकृती ढासळली. एका मादी बछड्याचा पुण्यातील रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तिन्ही बछडयांना गंभीर अवस्थेतच उपचारांसाठी रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेच्या हवाली करण्यात आले होते. इतर दोघांच्या प्रकृतीतही फारशी सुधारणा दिसून आलेली नाही. मात्र बछड्यांच्या प्रकृतीबाबत वनविभागाकडून माहिती घ्या, असे सांगत रेस्क्यू या प्राणीप्रेमी संस्थेच्या प्रमुख नेहा पंचमिया यांनी माहिती देण्यास नकार दिला. तिन्ही बछड्यांच्या देखभालीत वैद्यकीय हलगर्जीपणा झाला का, याबाबतही लवकरच चौकशी सुरु होण्याची शक्यता असल्याचे संकेत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.