मुंबईतील नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम हे सरासरी ३६ टक्के तर मिठी नदीच्या सफाईचे काम सरासरी ७५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र, शहरातील नालेसफाईचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरु असून आजवर केवळ १८ टक्केच काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांचे अतिरिक्त कारभारामुळे शहरातील नालेसफाईच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
( हेही वाचा : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल )
मुंबईमध्ये एप्रिल महिन्याच्या मध्यान्हाला नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून यासर्व नालेसफाईच्या कामावर यंदा लोकप्रतिनिधींची लक्ष नसल्याने महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी विशेष भरारी पथके तयार करून सफाईच्या कामांवर लक्ष ठेवलेला आहे. शिवाय प्रत्येक अतिरिक्त आयुक्तांना आठवड्यातून दोनदा आपल्या हद्दीतील नाल्यांची पाहणी करून सफाईच्या कामांवरही लक्ष ठेवण्याचे निर्देश आहेत. परंतु पूर्व व पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईच्या तुलनेत शहर भागातील सफाईचे काम हे केवळ १८ टक्के झाल्याची माहिती मिळत आहे. शहर भागातील माटुंगा रेल्वे स्थानकासह दादर टि.टी.हिंदु कॉलनी आदी भागांमध्ये पाणी तुंबण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दादर-धारावी नाल्याच्या सफाईला अद्यापही सुरुवातही झालेली नाही. अतिरिक्त आयुक्त(शहर) डॉ. संजीव कुमार यांनी शहर भागातील आजवर एकदाच पाहणी केली असून त्यानंतर नालेसफाईच्या कामांच्या पाहणीकडे दुर्लक्ष केला जात आहे. शहरांमध्ये नाल्यांची संख्या कमी असूनही अद्यापही सफाईचे काम योग्य गतीने होताना दिसत नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
४४ टक्के सफाईचे काम पूर्ण
दरम्यान, पश्चिम उपनगरातील सर्व नाल्यांची ३६ टक्के सफाई झाली असून सर्वांत जास्त सफाईचे काम हे पूर्व उपनगरातील नाल्यांमध्ये झाल्याचे पहायला मिळत आहे. पूर्व उपनगरांमध्ये आतापर्यंत ४४ टक्के सफाईचे काम पूर्ण झाले आहे. नाल्यांच्या सफाईसाठी एक वर्षांकरताच कंत्राटदार नियुक्त करण्यात आल्याने एप्रिल महिन्यापासून सफाईचे काम हाती घेण्यात आले, तर मिठी नदीसाठी मागील वर्षीच दोन वर्षांकरता कंत्राटदारांची निवड करण्यात आली. त्यामुळे कंत्राटदारांची निवड आधीच झालेली असल्याने मिठी नदीच्या सफाईचे काम एप्रिलपूर्वीच करण्यात आल्याने आतापर्यंत सरासरी ७४ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मिळत आहे.
पूर्व उपनगरांमध्ये अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी नालेसफाईच्या आढावा घेत अधिकाऱ्यांकडून घेत असल्याने उपप्रमुख अभियंता(पूर्व उपनगरे) विभास आचरेकर यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे लक्ष असल्याने येथील सफाईचे काम जलदगतीने होताना दिसत आहे.
यासंदर्भात पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता अशोक मेस्त्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या मोठ्या नाल्यांची सरासरी ३६ तर मिठी नदीच्या सफाईचे काम ७५ टक्क् पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या सफाईचे काम ३१ मे पूर्वीच पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक नालेसफाईच्या कामांवर प्रत्येक अधिकाऱ्यांचा बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम उपनगरात भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी गुरुवारी वालभट नाल्यांमधील गाळ अद्यापही काढण्यात न आल्याने सोशल मिडियावरून व्हिडीओ व्हायरल करत प्रशासनाला इशारा दिला होता, त्यानंतर शुक्रवारी या नाल्यात पोकलेन मशिन उतरवून सफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे सातम यांनी प्रशासनाचे धन्यवाद मानताना, या नाल्याची सफाई १०० टक्के झाल्यानंतरच आम्ही समाधान व्यक्त करू असेही म्हटले आहे.
नालेसफाईच्या कामांची टक्केवारी
- शहर : १८ टक्के
- पूर्व उपनगरे : ४४ टक्के
- पश्चिम उपनगरे : ३६ टक्के