Budget 2023: अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर…

Cm eknath shinde reaction on budget 2023
Budget 2023: अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर...

गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. रोजगार निर्मिती, शेतकरी, कामगार, महिला, युवक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे राज्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होण्याच्या प्रयत्नांना पाठबळ देणारा अर्थसंकल्प, असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला या अर्थसंकल्पाद्वारे चालना मिळणार असल्याचे सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

भविष्यवेधी अर्थसंकल्प

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाच्या अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प सीतारामण यांनी बुधवारी मांडला. शहरी आणि ग्रामीण असा संतुलन साधणारा हा अर्थसंकल्प असून मध्यमवर्गीय, बळीराजा, उद्योजक, युवक, महिला अशा सर्व घटकांना सुखावून टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. जगभरात होणाऱ्या नव्या बदलांच्या आणि त्याच्या आव्हानांचा विचार करणारा असा भविष्यवेधी अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सीतारामण यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना फायदा

‘पायाभूत सुविधा, कृषी, रोजगार, पर्यावरण अशा सर्वंच क्षेत्रांसाठी अतिशय भरीव तरतुद या अर्थसंकल्पात दिसते. पायाभूत सुविधांसाठी १० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांना फायदा होईल त्यामुळे निश्चितच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रामध्येही दिसून येईल. कर रचनेमध्ये ७ लाखांपर्यंतची केलेली उत्पन्नाची मर्यादा विशेषता मध्यमवर्गास दिलासा देणारी आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्र स्पष्ट

गेले तीन वर्षे कोविड संकटात होती. त्यातून बाहेर येण्यासाठी या नव्या कर रचनेचा फायदा होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मांडलेली सप्तर्षी कल्पना खरोखरच वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत यामध्ये सर्वंकष विकास, अंत्योदय योजना, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक दडलेल्या क्षमतांचा विकास, युवाशक्ती, वित्तीय क्षेत्र यांचा समावेश केलेला आहे. यातून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीचे चित्र स्पष्ट होते.

काही निर्णय महाराष्ट्रात आपण राबवत असलेल्या योजना, प्रकल्प, संकल्पनांशी एकरूप असे आहेत. इंडिया अॅट १०० (India@100) या धोरणात चार क्षेत्रांना केंद्रीभूत मानण्यात आले आहे. त्यामध्ये महिला सक्षमीकरण, पीएम विकास म्हणजेच आपल्या पारंपारिक कारागिरांचा सन्मान, पर्यटन आणि हरित विकास यांचा समावेश आहे. या चारही क्षेत्रात आपण महाराष्ट्रात यापुर्वीच काम सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

देशामध्ये महाराष्ट्रातील लघुउद्योग हे सर्वाधिक कार्यक्षम समजले जातात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता क्रेडिट हमी योजनेमध्ये प्रस्तावित सुधारणांमुळे हे लघुउद्योग अधिक उत्पादनक्षम होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रामध्ये कालच पौष्टिक तृणधान्य वर्षाचा शुभारंभ करण्यात आला. हैदराबाद येथील मिलेट्स सेंटर ऑफ एक्सलन्सला केंद्र सरकारने दिलेला सपोर्ट खरोखरच कौतुकास्पद आहे. या तृणधान्ये वर्ष साजरे करीत असताना त्याची अर्थसंकल्पात तरतूद होणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. आम्हाला खात्री आहे की हे तृणधान्य वर्ष महाराष्ट्राच्या एकूण बाजारपेठेसाठी नक्कीच पोषक असेल.

(हेही वाचा – Budget 2023: निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात उल्लेख केलेलं ‘श्रीअन्न’ म्हणजे काय?)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here