बहुप्रतिक्षेत सिनेमा धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 13 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि ठाण्यातील एक आघाडीचं नाव असलेले आनंद दिघे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे.
…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेवटचा सीन पाहणं टाळलं
नुकताच मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह धर्मवीर चित्रपट पाहण्यासाठी हजेरी लावली. मात्र या चित्रपटातील शेवटचा सीन, प्रसंग पाहणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. शेवट न पाहताच ते थिएटरच्या बाहेर निघून गेले. यामुळे सर्वच जण अवाक् झाले. तो शेवट सीन होता आनंद दिघेंच्या मृत्यूचा… थिएटर बाहेर आलेल्या मुख्यमंत्र्यांना माध्यमांनी याविषयी विचारणा केली असता ते म्हणाले, मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. कारण आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यथित झालेले बाळासाहेब पाहिले आहे. आनंद दिघेंचा मृत्यू शिवसैनिकांवर एकप्रकारचा आघात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काय होता तो प्रसंग
मुख्यमंत्री – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे या चित्रपटातील आनंद दिघे यांचा अपघात आणि त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूचा प्रसंग पाहाणं टाळले. उद्धव ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट न पाहाताच चित्रपटगृह सोडले. चित्रपटात शेवटच्या 10 मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आनंद दिघे, त्यांची सिंघनिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले असून ते प्रसंग अंगावर काटा आणणारे आहे.
Join Our WhatsApp Community