‘विकास’ कामांचा भार मुख्यमंत्र्यांच्या मानेवर, म्हणाले…

101

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला असल्याने आज त्यांच्यावर महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे कळतंय. उद्धव ठाकरे हे मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रासाने त्रस्त असल्याने सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. दरम्यान, यासंदर्भातील एक निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

(हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना मानेचा आणि मणक्याचा त्रास; दोन दिवसांत होणार शस्त्रक्रिया!)

मुख्यमंत्र्यांचं निवेदन जसेच्या तसे

गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.