राज्यात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्य सरकार लॉकडाऊन करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहे. त्याची पुढील कार्यवाही करण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठक बोलावली आहे. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असून, बैठकीत राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत चर्चा करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत बैठक केल्यानंतर लॉकडाऊनबाबत अधिकृत घोषणा करणार आहेत. लॉकडाऊन करायची वेळ आली आहे. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये म्हणून निर्णय घ्यावा लागणार आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते.
जनतेशी पुन्हा साधणार संवाद?
राज्यात कडक निर्बंध करताना आणि विकेंड लॉकडाऊन करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. तसाच संवाद मुख्यमंत्री संपूर्ण लॉकडाऊन करण्यापूर्वी साधणार असल्याची माहिती मिळत आहे. एवढेच नाही लॉकडाऊन कसे असेल, याची माहिती देखील ते जनतेसमोर ठेवणार आहेत. राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास जनतेसाठी पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात, हे देखील महत्वाचे आहे.
(हेही वाचाः ठाकरे सरकार लॉकडाऊनच्या निर्णयावर ठाम! दोन दिवसांत निर्णय!)
लॉकडाऊन झाल्यास पॅकेज मिळणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती. गरीबांना मदत देण्याची माझी भूमिका आहे, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना सांगितले होते.
कालच्या बैठकीतले मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे मुद्दे
- निर्णय घेण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही, पण जगानेही तो स्वीकारला आहे.
- लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये.
- लोकांचे येणे-जाणे कमी करणे हा उद्देश आहे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचे नियोजन करा. ‘पीक अवर’ ही संकल्पना आता बदलायला हवी.
- निवडणूक आणि लग्न सराई सुरू झाली. यामुळे 25 वर्षांवरील मुलं सुद्धा संक्रमित होत आहेत. 45 वर्षांवरील लोकांप्रमाणेच, आता 25 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांनाही लस देण्याची केंद्राकडे विनंती केली आहे.
- व्हॅक्सिनचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडला.
- राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उपलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदींबाबतचा आढावा घेण्यात आला.
- लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही.
- राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं सर्व पक्षांना आवाहन.