SBI च्या तिजोरीतील चिल्लरवर डल्ला! तब्बल ११ कोटींची नाणी गायब, CBI चौकशी सुरू

126

देशात सरकारी बँका या सर्वांत जास्त विश्वासार्ह मानल्या जातात. तसेच आपले पैसे आणि दागिने सुरक्षित रहावे, यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. पण जर बँकेतच चोरी झाली तर…अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पैसेच चोरीला गेल्याची माहिती राजस्थानमधून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिजोरीतूनच कोट्यवधी रुपये गायब झाले होते. या बँकेच्या तिजोरीतून तब्बल 11 कोटी रुपयांची चिल्लर गायब झाली होती. या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार आहे. राजस्थानमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेहंदीपूर बालाजी शाखेतील ही घटना आहे.

या प्रकरणी एफआयआर दाखल

या घटनेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने हा तपास सीबीआय सोपवला असून सीबीआयने स्वतः या प्रकऱणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. परंतु या प्रकरणाची व्याप्ती बघता बँकेने सीबीआयकडे हे प्रकरण देण्याची मागणी केली होती.

… अन् बँकेचे अधिकारी हादरले

एसबीआयने या नाण्यांची मोजणी सुरू केली तेव्हा एसबीआय शाखेतून नाण्यांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आले. यादरम्यान बँकेतील रोख रकमेची हेराफेरी झाल्याचे निदर्शनास आले. जयपूरमधील एका खासगी कंत्राटदाराला 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी मोजण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या मोजणीमध्ये शाखेतून 11 कोटी रुपयांची नाणीच गायब असल्याचे समोर आले. सुमारे 2 कोटी रुपये असलेल्या केवळ 3,000 नाण्यांच्या पिशव्यांचा हिशेब लागला. कारण ही नाणी आरबीआयकडे जमा करण्यात आली होती.

(हेही वाचा – PMGKP: कोरोनाशी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी)

एक रूपया आणि दोन रूपयाची नाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गायब होण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. एसबीआयच्या शाखेत जमा रकमेमध्ये अफरातफर झाल्याचा संशय आल्याने या नाण्यांची मोजणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हळू हळू हा आकडा एक, दोन कोटींवरून थेट अकरा कोटींवर गेल्याने मोजणी करण्यासाठी आलेले बँकेचे अधिकारी देखील हादरले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.